ऑनलाईन टीम / पटना :
माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक समता पक्ष (रालोसप) रविवारी संयुक्त जनता दलात (यू) विलीन झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या उपस्थितीत कुशवाह यांनी आपल्या संपूर्ण पक्षाला जेडीयूमध्ये विलीन करण्याची औपचारिक घोषणा केली. कुशवाह जेडीयूमध्ये सामील होताच नितीशकुमारांनी संसदीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून कुशवाह यांची नियुक्ती केली.
कुशवाह हे आठ वर्षांनंतर जेडीयूत पुन्हा परतले आहेत. जेडीयूपासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी 2013 मध्ये रालोसप पक्षाची स्थापना केली. जेडीयूमध्ये सामील झाल्यावर कुशवाह म्हणाले की, रालोसप हा पक्ष जदयूमध्ये विलीन करणे हा जनादेश आहे, तो माझा वैयक्तिक निर्णय नाही. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेने यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
पक्ष किंवा सरकारमधील कोणत्याही पदासाठी आपला लोभ नाही. आम्हाला बिहारच्या जनतेसाठी काम करायचे आहे. या विलीनीकरणामुळे बिहारमध्ये नेहमीच न्यायाची निवड केली जाईल, त्यामुळे गरीब जनता सुखी होईल.









