चीनमध्ये कार बनवून भारतात विकू नका – इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय मार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अमेरिकेच्या टेस्ला या कंपनीला चांगलेच फैलावर घेतले आहे. या कंपनीने इलेक्ट्रिक कार चीनमध्ये बनवून भारतात विकू नयेत, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. या कंपनीने भारतात कार्स बनवाव्यात असे वारंवार सांगण्यात आले आहे. यासाठी शक्य तितक्या सवलतीही कंपनीला देऊ केल्या आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
गेल्या वर्षापासून टेस्ला कंपनी भारतात येणार असे सांगण्यात येत होते. कंपनीनेही तसे संकेत दिले होते. मात्र, अद्याप कंपनीने भारतात उत्पादन सुरु केलेले नाही. कंपनीला जमीन व इतर सुविधा देण्यात आल्या आहेत. या कंपनीने भारतात कार तयार कराव्यात आणि त्यांची इतर देशांना निर्यात करावी, असे कंपनीकडे स्पष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी प्रसारमाध्यमांच्या एका कार्यक्रमात बोलताना दिली.
सरकारकडून सर्व साहाय्य
टेस्ला भारतात कारखाना सुरु करणार असेल तर या कंपनीला शक्य ते सर्व साहाय्य देण्यात येईल. यासंबंधी कंपनीच्या अधिकाऱयांसमवेत चर्चा सुरु आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांच्या आयातीवरील शुल्क कमी करण्याची मागणी केली असून त्यामुळे संशय निर्माण झाला आहे. कंपनीने प्रथम भारतात आपले उत्पादन सुरु करावे. त्यानंतर सवलतींच्या मागण्यांवर विचार केला जाईल, असे अवजड उद्योग मंत्रालयाने कंपनीला काही महिन्यांपूर्वीच स्पष्ट पेले होते.
टाटांच्या कार्स उत्तम
देशी कंपनी टाटा मोटर्सनेही इलेक्ट्रिक कार बनविण्याचे तंत्रज्ञान विकसीत केले असून या कंपनीच्या कार्स टेस्लापेक्षा कमी प्रतीच्या नाहीत. त्या आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्याच आहेत. त्यामुळे टेस्लावरच भारत अवलंबून आहे असे नाही. टेस्लाचा कारखाना भारतात सुरु झाल्यास तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा विषय असेल. मात्र, यासाठी टेस्लाच्या नाकदुऱया काढण्याची आवश्यकता नाही. भारत स्वदेशी तंत्रज्ञानावर विसंबून राहू शकतो, असे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले.









