उघडकीस आलेल्या घटनेने खळबळ-भीती
प्रतिनिधी/ बेळगाव
दिल्ली येथील निजामुद्दिन या भागात तबलिगी जमात या इस्लाम धर्मीय संस्थेच्या कार्यक्रमात येळ्ळूरमधील एक जण सहभागी झाला होता. तो काही दिवसांपूर्वीच येळ्ळूरमध्ये परतला आहे. मात्र, त्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मंगाईनगर येळ्ळूरमधील एक जण असल्याचे उघडकीस आल्यानंतर याची माहिती ग्राम पंचायतीला देण्यात आली. त्यानंतर तातडीने डॉक्टरांना बोलावून त्याला आणि त्याच्या पत्नीला तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्यांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे. दिल्ली येथील त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमधील 200 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या कार्यक्रमात हजर होऊन सर्व जण घरी परतले होते. येळ्ळूरमधीलही एक जण त्या कार्यक्रमाला हजेरी लावून परतला होता. मात्र त्याने ही बाब गुप्त ठेवली होती.
आता संपूर्ण देशातच याबाबत दक्षता घेण्यात आल्यामुळे येळ्ळूरमधील त्या तरुणाचे नाव उघडकीस आले. तातडीने पोलीस, डॉक्टर्स आणि ग्राम पंचायत सदस्य तसेच कोरोना नियंत्रण समितीचे सदस्य दाखल झाले. त्यांनी त्या तरुणाला तातडीने रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटलला चाचणीसाठी जाण्यास सांगितले. प्रारंभी मी तेथे गेलो नव्हतो, असे त्याने सांगितले. मात्र पोलिसांनी आणलेल्या यादीमध्ये त्याचे नाव असल्यामुळे त्याला चांगलेच खडसावण्यात आले. ग्राम पंचायत अध्यक्षा अनुसया परीट, कोरोना नियंत्रण कमिटीचे सदस्य वामन पाटील, तानाजी हलगेकर, शिवाजी पाटील, राजू उघाडे, रमेश धामणेकर, डॉ. रमेश दंडगी, पीडीओ अरुण नायक यांनी त्याला व त्याच्या पत्नीला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला पाठवून दिले.









