तुर्कीमधील मुष्टियुद्ध स्पर्धा- दोघांचे किमान कांस्यपदक निश्चित, डबल वर्ल्डचॅम्पियनला झरीनचा धक्का
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
धक्कादायक निकालाची मालिका कायम राखत भारताची महिला बॉक्सर निखत झरीनने शुक्रवारी झालेल्या महिलांच्या 51 किलो वजन गटाच्या लढतीत दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या कझाकच्या नझीम कीझायबेचा पराभव करून बॉस्फोरस मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. झरीनप्रमाणे गौरव सोळंकीनेही पुरुषांच्या 57 किलो वजन गटातून उपांत्य फेरी गाठत किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.
तुर्कीमधील इस्तंबुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत झरीनने आधीच्या फेरीत 2019 ची वर्ल्ड चॅम्पियन रशियाच्या पाल्तसेवा एकतेरिनाला पराभवाचा धक्का दिला होता. या फेरीतही कझाकच्या प्रतिस्पर्धीविरुद्ध ती आत्मविश्वासाने व कोणतेही दडपण न घेता रिंगणात उतरली होती. प्रारंभापासूनच तिने या लढतीवर वर्चस्व राखले आणि अखेरपर्यंत ते कायम राखत कीझायबेवर 4-1 अशा गुणांनी मात करून शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविले. कीझायबेने 2014 व 2016 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. उपांत्य फेरी गाठत झरीनने किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.
झरीनप्रमाणेच 2018 मधील राष्ट्रकुल सुवर्णविजेत्या गौरव सोळंकीनेही पुरुषांच्या 57 किलो वजन गटातून उपांत्य फेरी गाठत किमान कांस्यपदक निश्चित केले आहे. आयीकोल मिझानविरुद्ध त्याला बराच संघर्ष करावा लागला. पण गौरवने तांत्रिक प्रभुत्व दाखवित अखेर 4-1 अशा फरकानेच विजय मिळविला. महिलांमधील अन्य खेळाडूंत सोनिया लाथेर (57 किलो गट), परवीन (60 किलो), ज्योती (69 किलो) यांना उपांत्यपूर्व लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुषांमध्ये शिवा थापालाही 63 किलो वजन गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत तुर्कीच्या हकन दोगनकडून 1-4 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला.
स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताचे दोन बॉक्सर्स उपांत्य फेरीत खेळताना दिसतील. झरीनची लढत 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्यजेत्या तुर्कीच्या बुसेनाझ काकिरोग्लूविरुद्ध होणार आहे तर गौरव सोळंकीची लढत अर्जेन्टिनाच्या निर्को कुएलोशी होणार आहे.









