प्रा. रामराव वाघ यांचा सांतआंद्रेवासियांना सवाल
प्रतिनिधी/ पणजी
अनेकदा आमदारकी मिळूनही मतदारसंघ अविकसितच ठेवण्यात ज्यांनी धन्यता मानली त्याच आमदाराला पुन्हा संधी देणार का? असा गंभीर सवाल सांत आंद्रेतील आम आदमी पार्टीचे उमेदवार प्रा. रामराव वाघ यांनी मतदारांना विचारला आहे.
सांत आंदेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्यावर थेट हल्ला चढवताना वाघ यांनी सिल्वेरा यांच्या कारकिर्दीतील अपयशांचा पाढाच पत्रकारांसमोर वाचला. सिल्वेरा यांनी मतदारसंघात एकही प्रकल्प पूर्णत्वास नेला नाही, त्यामुळे सरकारी पैसा वाया कसा घालवायचा याचे आदर्श उदाहरण मतदारांसमोर ठेवले आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार आमदारास पुन्हा ’सेवा’ करण्याची संधी द्यायची की नव्या दमाच्या उमेदवारास विजयी करायचे याचा विचार करावा, असे आवाहन वाघ यांनी केले आहे.
सगळेच प्रकल्प ठेवले अर्धवट
सिल्वेरा यांनी 10-15 वर्षांपूर्वी डोंगरी भागात पूलाचे बांधकाम हाती घेतले होते, तो प्रकल्प अद्याप अपूर्णावस्थेत आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या शेतजमिनी गेल्या आहेत, त्याची भरपाई अद्याप देण्यात आलेली नाही. वीज, पाणीपुरवठा तसेच चांगले रस्ते यासारख्या मूलभूत सुविधांचाही सांत आंदेत अभाव आहे. त्यामुळे सिल्वेरा यांनी आतापर्यंत केलेल्या कामाबाबत श्वेतपत्रिका जारी करावी, असे आव्हान वाघ यांनी दिले आहे.
वाघ पुढे म्हणाले कि, सांत आंदेत खजान शेती हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे, बांधाची दुरुस्ती होत नसल्याने शेतात पाणी भरून ते नष्ट होण्याचे प्रकार वाढत आहेत. खजान कृती समितीच्या माध्यमातून आम्ही हा मुद्दा पुढे आणला आहे. हा प्रश्न अनेकदा आला, परंतु आमदाराला मतदारांच्या भविष्याची चिंता नसल्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही, असे वाघ म्हणाले.
गोमेकॉ सांतआंद्रेत आणि नोकऱया सत्तरीत?
गोमेकॉ सांत आंद्रेत आणि तेथील भरमसाठ नोकऱया मात्र सत्तरीतील लोकांना देण्यात येतात, हा प्रकार दोळ्यासमोर घडत असूनही आमदार सिल्वेरा मूग गिळून गप्प राहिले. आपल्या मतदारांवर होत असलेल्या अन्यायाचेही त्यांना सोयर सुतक नव्हते. आता जेव्हा ते मत मागण्यासाठी दारात येतील तेव्हा मतदारांनी त्यांना जाब विचारावा, असे आवाहन वाघ यांनी केले.
मरिना प्रकल्प लादण्याचे प्रयत्न
याच आमदाराने यापूर्वी स्वतःच्या मतदारांवर न्हावशी येथील मरिना प्रकल्प लादण्याचे प्रयत्न केले. सदर प्रकल्प रद्द करण्याची आणि झुआरी नदीतील अवैध मासेमारी थांबवण्याची नागरिकांनी मागणी केली, तरीही आमदारांनी त्याचे ऐकले नाही, असे वाघ म्हणाले.
अशा निक्रिय आणि बेजबाबदार व्यक्तीला आणखी संधी द्यायची की नाही याचा सारासार विचार करून मतदान करावे. यातून आप’ला सत्ता मिळाल्यास खजान शेतात सुधारणा करणे, मतदारसंघातील बेरोजगारीचे प्रश्न सोडविणे, शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा व अन्य मूलभूत सुविधा निर्माण करणे या विषयांना प्राधान्य देणार असल्याचे वाघ यांनी सांगितले. सध्या काँग्रेसला मत देणे म्हणजे भाजपला पाठिंबा देण्यासारखे आहे याचा अनुभव गेल्या निवडणुकीतही सांत आंदेतील मतदारांनी घेतला आहे. त्याची पुनरावृत्ती यंदा होऊ नये यासाठी मतदारांनी आप ला मतदान करावे, असे आवाहन रामराव वाघ यांनी केले.









