सतीश सावंत यांनी केली पाहणी
न. पं. च्या कारभारावर व्यक्त केली नाराजी
वार्ताहर / वैभववाडी:
शासनाच्या पर्यटन विकास निधीमधून सुमारे दीड वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या महाराणा प्रतापसिंह कलादालनाचे काम संबंधित ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. पावसाळय़ात कलादालनाच्या इमारतीला गळती लागली. गळती होऊ नये म्हणून नगरपंचायतीला इमारतीवर कागद टाकण्याची वेळ आली. महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा व परिसराचीही दयनीय अवस्था झाली आहे. इमारतीच्या डागडुजीसाठी व परिसर सुशोभिकरणासाठी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या सहकार्याने निधी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे दिली.
सावंत यांनी येथील कलादालनाची नुकतीच पाहणी केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, प्रदीप रावराणे, देवानंद पालांडे आदी उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले, येथील महाराणा प्रतापसिंह कलादालन हे देशातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले आहे. नगरपंचायतीच्या सहकार्याने ते उभारण्यात आले आहे. मात्र, नगरपंचायतीकडून कलादालनाची कोणतीच देखभाल-दुरुस्ती होताना दिसत नाही. कलादालनासाठी शासनाने 75 लाख रुपये इतका निधी खर्च केला आहे. मात्र, दीड वर्षात या इमारतीची दुरावस्था झाली आहे. या गोष्टींचा खेद वाटतो. या कलादालनाचा उपयोग राजकीय हेतूने येथील लोकप्रतिनिधी करून घेत आहेत व आता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप त्यांनी केला.
कलादालनाकडे न. पं. चे दुर्लक्ष
तालुक्मयातील व शहरातील जनतेला या कलादालनाचा उपयोग व्हावा. तरुणांनी व जनतेने महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा घ्यावी म्हणून शासनाने लाखो रुपयांचा निधी दिला आहे. याठिकाणी बागबगीचा, शोभिवंत फुलझाडे लावलेली होती. मात्र, सध्या महाराणा प्रताप कलादालन भकास दिसत आहे. याबाबत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व शिवसेना पदाधिकारी यांच्या समक्ष पाहणी केली असता कलादालनात अनेक गोष्टींची उणीव भासली. महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा बसविलेला परिसर अत्यंत विद्रूप दिसत असून पुतळा परिसराचेही सुशोभिकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारण बाजूला ठेवून विकास करणार
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांनी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीला कलादालन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे सांगितले आहे. त्यादृष्टीने शासकीय अभियंता यांच्याकडून प्रस्ताव तयार करून घेण्यात येणार आहे. महाराणा प्रताप यांच्या कलादालनाची झालेली दुरावस्था येथील रावराणे समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या निदर्शनास आणून दिली आहे. यामध्ये राजकारण बाजूला ठेवून या परिसराचा विकास करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.









