प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीतील अनपेक्षित आणि धक्कादायक निकालामुळे सीमाभागात उलटसुलट तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. सर्व वॉर्डांतून मराठी भाषिक आणि म. ए. समितीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त पाठिंबा होता. त्यामुळे महापालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता येणार अशी अटकळ होती. मात्र मतमोजणीनंतर आलेल्या निकालामुळे शहरवासियांमधून सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षांनी पक्षाच्या चिन्हांवर निवडणूक लढविली होती. अशातच यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्कादेखील घटला आहे. उपनगर भागात सर्व मतदान केंद्रांवर शुकशुकाट पसरला होता. त्यामुळे निवडणुकीत कुणाला मतदान होणार? याकडे सर्वच उमेदवारांचे लक्ष लागले होते. 4 लाख 30 हजार मतदारांपैकी 2 लाख 15 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे केवळ 50.41 टक्के मतदान झाले असून वॉर्ड पुनर्रचनेमुळे असंख्य मतदारांची नावे गहाळ झाली होती. याचा फटका या निवडणुकीत बसल्याचे दिसून आले.
निवडणूक प्रचारावेळी सर्व वॉर्डांमधून म. ए. समिती आणि मराठी भाषिक उमेदवारांना भरघोस पाठिंबा मिळत होता. तसेच काही ठिकाणी उमेदवारांना निवडून येण्याची आशा होती. निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता मराठी भाषिकांना व म. ए. समितीच्या उमेदवारांना बहुमत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली असून सोमवारी झालेल्या मतमोजणीवेळी धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल समोर आले. मराठी भाषिकांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱया चव्हाट गल्ली परिसरातील वॉर्ड क्रमांक 8 मध्ये अमर येळ्ळूरकर यांचा पराभव झाला आणि त्याठिकाणी मोहम्मद संगोळ्ळी यांना विजय मिळाला आहे.
तसेच वॉर्ड क्रमांक 24 मध्ये माजी महापौर महेश केशव नाईक यांच्या बाजूने सर्व जनता होती. पण या ठिकाणी देखील महेश नाईक यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर वॉर्ड क्रमांक 9 मधील म. ए. समितीच्या उमेदवार मनीषा देवकर यांचा 23 मतांनी पराभव झाला. अपक्ष उमेदवार पूजा पाटील या विजयी झाल्या. या वॉर्डमध्ये 39 मते नोटाला पडली आहेत.
वॉर्ड क्रमांक 41 मध्ये चुरशीची लढत होती. या ठिकाणी रतन मासेकर यांना विजय मिळेल, असा विश्वास होता. पण याठिकाणी देखील पराभव पत्करावा लागला. माजी महापौर किरण सायनाक यांच्या पत्नी वॉर्ड क्रमांक 43 मध्ये निवडणूक लढवित होत्या. पण या ठिकाणी देखील म. ए. समितीला पराभव सोसावा लागला. अशाप्रकाराच्या निकालामुळे नागरिक बुचकळय़ात पडले आहेत.









