दरवर्षी एक मे रोजी मिळतो निकाल
‘कोरोना’मुळे यंदा प्रथमच परिस्थिती
प्रथम सत्र, चाचण्यांवर गुण देणार
निकाल मिळणार शाळेच्या पहिल्या दिवशी
बारावीची पुस्तके बालभारतीकडे तयार
लॉकडाऊन उठल्यानंतरच येणार मार्केटमध्ये
प्रतिनिधी / सावंतवाडी:
मार्च-एप्रिलमध्ये शालेय स्तरावर होणाऱया परीक्षा, त्यानंतर एक किंवा दोन मे रोजी जाहीर होणारा निकाल आणि त्यानंतर पडणारी उन्हाळी सुट्टी या चक्राला यंदा प्रथमच ब्रेक मिळाला आहे. यंदा लॉकडाऊनमुळे मार्च-एप्रिलमध्ये होणाऱया परीक्षांनाच सुट्टी मिळाली. त्यामुळे यावेळी एक मे रोजी प्रथमच विद्यार्थ्यांच्या हाती प्रगतीपुस्तक मिळणार नाही. शालेय स्तरावर परीक्षाच न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना गुणांऐवजी श्रेणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला. तरीदेखील एक मे रोजी शालेय स्तरावर देण्यात येणाऱया निकालाविषयी मुले आणि पालकांच्या मनात उत्सुकता असते. यंदा, मात्र कोरोनामुळे अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली. ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने प्रथम पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या पाठोपाठ नववी आणि अकरावीच्या परीक्षाही रद्द कराव्या लागल्या. दहावीचा भूगोलचा पेपरही रद्द झाला. महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे यंदाचे नवे शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडणार आहे.
दहावी आणि बारावी हे दोन वर्षे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाची मानली जातात. त्यामुळे नववी आणि अकरावीची परीक्षा झाली की विद्यार्थ्यांना क्लासचे वेध लागतात. शालेय, महाविद्यालयीन स्तरावरही असे क्लास घेतले जातात. याशिवाय येथील मुले अशा क्लाससाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर गाठतात. मात्र, यंदा ‘कोरोना’मुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. दहावीची पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र, बारावीचा अभ्यासक्रम यंदापासून बदलला आहे. त्याची पुस्तके आणि गाईड्सही अद्याप मार्केटमध्ये आलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. याला पर्याय म्हणून काहींनी ऑनलाईन क्लास सुरू केले आहेत. तर बोर्डाने बारावीची नवी पुस्तके पीडीएफ स्वरुपात ऑनलाईन उपलब्ध केली आहेत.
22 मार्चला जनता कर्फ्यू आणि त्यानंतर प्रथम 21 दिवस आणि नंतर 3 मेपर्यंत वाढलेले लॉकडाऊन यामुळे महाविद्यालयीन स्तरावरही परीक्षा झालेल्या नाहीत. त्या परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे यात दरवर्षी जून-जुलैपासून सुरू होणारे नवे शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार, याचीही अद्याप निश्चिती झालेली नाही.
आधीच्या सत्र परीक्षांवर आधारित निकाल
यंदा परीक्षा झाल्या नसल्या तरी पहिल्या सत्राची परीक्षा, दोन चाचण्या आणि स्वाध्याय याद्वारे मुलांचा अंतिम निकाल बनविण्याचे काम सुरू आहे. निकाल तयार झाल्यावर तो मुलांना व्हॉट्सऍपवर पाठविण्यात येणार आहे. आणि शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी तो प्रत्यक्ष मुलांना देण्यात येणार आहे. पाचवी-सहावीसाठी 50 गुणांचे आकारिक मूल्यमापन तर सातवी-आठवीसाठी 40 गुणांचे आकारिक मूल्यमापन आहे. तेदेखील अंतिम निकालात विचारात घेतले जाणार आहे. नववीसाठी प्रथम सत्र (100), प्रथम चाचणी (20), द्वितीय चाचणी (20), स्वाध्याय (10 गुण) अशा एकूण 150 गुणांचा विचार करून रुपांतरित 100 पैकी गुण दिले जाणार आहेत. तर अकरावीसाठी दोन चाचण्या (25-25) आणि प्रथम सत्र (50) अशा 100 गुणांचा विचार केला जाणार आहे. दहावीचे कला-क्रीडा गुण पाठविण्यासाठी बोर्डाने मुदतवाढ दिल्याचे सावंतवाडी कळसुलकर हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर यांनी सांगितले.
बारावीची नवी पुस्तके लॉकडाऊननंतरच
बारावीची पुस्तके बालभारतीकडे छापून तयार आहेत. यंदा कला, विज्ञान आणि वाणिज्य या तिन्ही शाखांचे अभ्यासक्रम बदलले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन बालभारतीने नवी पुस्तके पीडीएफ स्वरुपात ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहेत. लॉकडाऊन उठताच ही पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध होतील, अशी महिती यथील सत्कार बुकस्टॉलचे संचालक विजयेंद्र पेडणेकर यांनी सांगितले.









