पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्ला : शेतकऱयांना मिळालेले स्वातंत्र्य सहन होत नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यांना विरोध दर्शविणाऱया विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला आहे. विरोधी पक्ष केवळ निषेधासाठी निषेध करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज जेव्हा केंद्र सरकार शेतकऱयांना त्यांचा हक्क देत आहे, तेव्हा लोक निषेधावर उतरले आहेत. विरोधकांनी राम मंदिराच्या भूमिपूजनालाही विरोध केला होता. ते ना शेतकऱयांसोबत आहेत ना सैनिकांसोबत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
नमामी गंगे योजनेच्या अंतर्गत उत्तराखंडमध्ये उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या चार मजली सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी विरोधकांवर ही जोरदार टीका केली. कित्येक वर्षे हे विरोधक एमएसपी (किमान आधारभूत किंमत) लागू करू असे म्हणतच राहिले, पण तसे झाले नाही. स्वामीनाथन आयोगाच्या इच्छेनुसार एमएसपी लागू करण्याचे काम आपल्याच सरकारने केले. आज हे लोक एमएसपीविषयीही संभ्रम निर्माण करत आहेत. देशात एमएसपी असेल आणि शेतकऱयाला देशात कुठेही उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्यही असेल. पण काही लोकांना हे स्वातंत्र्य सहन होत नाही, अशी टीका मोदी यांनी केली.
सदोदित विरोध
चार वर्षांपूर्वी जेव्हा देशातील शूर जवानांनी सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले होते तेव्हा हे लोक त्याचा पुरावा मागत होते. सर्जिकल स्ट्राइकलाही विरोध दर्शवून या लोकांनी देशासमोर आपला हेतू स्पष्ट केला आहे. हे लोक ना शेतकऱयांसोबत आहेत ना युवकांबरोबर आहेत ना शूर सैनिकांसमवेत. आमच्या सरकारने सैनिकांना ‘वन रँक, वन पेन्शन’चा लाभ दिला, मग यांनी त्यालाही विरोध केला. भारताच्या पुढाकाराने जेव्हा संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करू लागले तेव्हा भारतात बसलेले हे लोक त्याचा विरोध करत होते. जेव्हा सरदार पटेल यांच्या सर्वांत उंच पुतळय़ाचे अनावरण केले जात होते तेव्हा देखील हे लोक त्यास विरोध करत होते, असे पंतप्रधान मोदी विरोधकांवर हल्ला करताना म्हणाले.
अयोध्येत भव्य राममंदिर बांधण्यासाठी भूमिपूजन केले गेले. या लोकांनी प्रथम सर्वोच्च न्यायालयात विरोध केला आणि त्यानंतर भूमिपूजनाला विरोध करण्यास सुरवात केली. हवाई दल आम्हाला आधुनिक लढाऊ विमानांची आवश्यकता आहे असे म्हणत राहिले आणि हे लोक त्याकडे दुर्लक्ष करत राहिले. परंतु आमच्या सरकारने फ्रान्स सरकारबरोबर राफेल विमानासाठी थेट करार केला तेव्हा त्यांना समस्या निर्माण झाली, असे मोदी यावेळी म्हणाले.
काळय़ा कमाईचा मार्ग संपल्याने अडचण
पंतप्रधान मोदींनी यावेळी विरोधकांवर हल्ला चढवताना नवीन कायद्यामुळे त्यांच्या काळय़ा कमाईचा एक मार्ग संपला आहे, म्हणून त्यांना अडचण होत आहे, असा आरोप केला. खुल्या बाजारात शेतकऱयांनी आपले उत्पादन विकू नयेत अशी विरोधी पक्षांची इच्छा आहे असा दावा त्यांनी केला. शेतकरी ज्यांची पूजा करतात अशा वस्तूंना आग लावून आता शेतकऱयांचा अपमान केला जात आहे, असे ते म्हणाले.









