ऑनलाईन टीम/तरुण भारत
पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेवरून घडलेल्या प्रकारावरून देशभरातलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. भाजपाकडून या मुद्द्यावरून पंजाब काँग्रेसवर गंभीर आक्षेप घेतले जात आहेत. दुसरीकडे देशभर पंतप्रधानांच्या स्वास्थ्यासाठी होम-हवन आणि मंत्रजाप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या एका विधानावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. पंजाबच्या टांडा भागामध्ये मुख्यमंत्री चन्नी यांची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत बोलताना चन्नी यांनी पंतप्रधानांचा ताफा अडकल्याच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. “अरे यार, तुम्हाला कोणताही धोका नव्हता. तुमच्या जवळपास कुणीही आलं नाही. कुठली नारेबाजी नाही झाली. कोणती दगडफेक झाली नाही. कोणतीही गोळी नाही झाडली गेली. मग तुम्ही जीव वाचवून आल्याचं काय सांगत आहात?” असा सवालच चन्नी यांनी केला आहे.