सक्तीचा लॉकडाऊन बेळगावकरांनी खऱया अर्थाने घेतला गांभीर्याने
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि शहराची गती थांबली. ना कुठे विक्रीची घाई ना कुठे खरेदीची गडबड, सर्व शहर अचानक स्तब्ध झाले आणि नागरिकांना सक्तीने घरात बसावे लागले. सतत गजबजाट असणाऱया बेळगाव शहराच्या चौकांमध्ये नीरव शांतता पसरली आणि रस्ते सुनसान झाले. हा सक्तीचा लॉकडाऊन बेळगावकरांनी खऱया अर्थाने गांभीर्याने घेतला आणि नियमांचे पालनही केले.
शनिवारी सकाळपासूनच कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला. तरुण भारत टीमने उद्यमबाग परिसरापासून कंग्राळी बुद्रुकच्या वेशीपर्यंत तसेच हायवे, बॉक्साईट रोड, कुमारस्वामी लेआऊट, हनुमाननगर, जाधवनगर असा दीर्घ पल्ल्याचा फेरफटका मारला. त्यावेळी कोठेही नागरिक रस्त्यावर आल्याचे आढळले नाही.
लॉकडाऊन काळात सकाळी 6 ते 10 या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सरकारने मुभा दिली. परंतु याच दरम्यान गल्लोगल्ली आणि बाजारपेठेत गर्दी वाढू लागली. ही गर्दी चिंता निर्माण करणारी ठरली. रुग्णसंख्याही वाढू लागली. परिणामी सरकारने विकेंड लॉकडाऊन जाहीर करून कडक निर्बंध घातले व दूध आणि औषधे वगळता अन्य सर्व सेवांना प्रतिबंध केला.
सर्व बाजारपेठाही झाल्या सुन्यासुन्या
एरव्ही सकाळी 6 ते 10 या दरम्यान शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ आणि शहरातील इतरत्र असणाऱया बाजारपेठांमध्ये गर्दी होत असे. सकाळी 9.30 पासूनच पोलीस नागरिकांना हटकत असत. शनिवारी सुरू झालेल्या कडक लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठाही सुन्यासुन्या झाल्या. विनाकारण फिरणाऱयांना बसणारा पोलिसी बडगा लक्षात घेऊन तरुणाईनेही बाहेर न पडणे पसंत केले.
सरकारने या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांना मुभा दिली आहे. त्यामुळे दूध केंदे, औषध दुकाने, दवाखाने व मालवाहतूक सुरू होती. मात्र, या सेवा वगळता अन्य सेवा बंद राहिल्या. गल्लोगल्लीत असणाऱया लहान दुकान-टपरीपासून मोठमोठी आस्थापने पूर्ण बंद राहिली. दूध आणि औषध वगळता अन्य कोणत्याही वस्तुंची खरेदी शनिवारी होऊ शकली नाही.
शहरातील सर्व चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त
शहरातील सर्व चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त आढळून आला. दुचाकी असो चार चाकी असो किंवा मालवाहतूक करणारी वाहने असोत तपासणी केल्याशिवाय पोलिसांनी कोणालाही पुढे जावू दिले नाही. हे चित्र सर्वत्रच आढळून आले. मात्र, काही ठिकाणी सफाई कर्मचारी महिला रस्ता स्वच्छ करताना आढळून आल्या. रुग्णांना घेऊन जाणाऱया रिक्षांची ये-जा सुरू होती. ज्यांना कोणतेच वाहन मिळाले नाही अशा रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांना चालत नेऊन दवाखान्यात दाखवून आणले.
लॉकडाऊनमुळे सध्या खबरदारी म्हणून धुणी-भांडी व घरकाम करणाऱया महिलांना सध्या लोकांनी कामासाठी येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा दुर्बल घटकांतील अनेक स्त्राr-पुरुष इंदिरा कॅन्टीनसमोर बसलेले आढळले. या कॅन्टीनमध्ये सकाळी नाष्टा, दुपारी जेवण व सायंकाळी पुलाव वितरित केला जात असल्याने अशा घटकांची सोय झाली.
कडक लॉकडाऊन असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य घरीच राहिले. त्यामुळे गृहिणींचे काम मात्र वाढले. घरकाम करणाऱया महिला येत नसल्याने त्यांची कामे आणि स्वयंपाक असा दुहेरी ताण त्यांच्यावर आला. कडक लॉकडाऊन करताच नागरिक सक्तीने घरी राहिले. हीच खबरदारी त्यांनी यापूर्वी घेतली असती तर ही वेळच आली नसती, असे मत एका अधिकाऱयाने व्यक्त केले. कडक लॉकडाऊननंतर पुन्हा खरेदीसाठी किंवा विनाकारण फिरण्याची आपली सवय कमी केली तरच कोरोनाला थोपविणे शक्मय आहे.









