जळगाव / प्रतिनिधी :
शिवसेनेत यायचे. राज्यमंत्रिपद मिळवायचे. तरीही पक्षाविषयी नाहक नाराजी व्यक्त करायची. हे बरोबर नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते व पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला.
अब्दुल सत्तार यांच्या नाराजी नाटय़ाविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, सत्तार यांनी आपण नाराज नसून मंत्रिपदाचादेखील राजीनामा दिलेला नाही, असे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर जाहीर केले आहे. मात्र, ते नाराज नव्हते, तर त्यांनी नाराजी पसरविण्याची गरजच नव्हती. शिवसेनेने रामदास कदम, दिवाकर रावते तसेच भास्कर जाधव यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदे दिली नाहीत. दुसरीकडे अब्दुल सत्तार हे कालच शिवसेनेत आले. तरीही त्यांना पक्षाने राज्यमंत्रिपद दिले. असे असताना त्यांनी नाराज का म्हणून व्हावे, असा सवाल पाटील यांनी केला.









