ऑनलाईन टीम / औरंगाबाद :
अमेरिकेची प्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था ‘नासा’मध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून 24 जणांना अडीच कोटींचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत शरद किसनराव गवळी (वय 38, रा. विशालनगर, गारखेडा) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 ऑक्टोबर 2016 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत कॅनाट प्लेस येथे फिर्यादी आर्किटेक्ट गवळी यांच्यासह 24 जणांची ‘नासा’मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोटींची फसवणूक करण्यात आली आहे.
आर्किटेक्ट गवळी याची ऍड. नितीन भवर याने अभिजित विजय पानसरे याच्यासोबत ओळख करून दिली होती. त्यावेळी पानसरे याने गवळीसह इतरांना आपली मे. सायन्स कुडोस नावाची संस्था असल्याचे सांगितले. या संस्थेला ‘नासा’कडून ‘आरआरसी रिएक्टर ऑफ मेगा वॅट पावर’ हा प्रकल्प तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. त्याबाबतचा करारही नासासोबत झाला आहे.
मात्र, संस्थेला पैसे कमी पडत आहेत. यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. तसेच नासाच्या कराराची बनावट कागदपत्रे दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली. ठेव रक्कमेची मुदत संपूनही पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली.









