प्रतिनिधी/ रत्नागिरी
या हंगामात येथील शेतकरी राबराब राबला…लॉकडाऊनमुळे दरवर्षीपेक्षा अधिक शेती केली…हंगामाच्या प्रारंभापासून वरूणराजाने चांगली कृपा हेती…शेतातही सोनं उगवल्याप्रमाणे भात, नाचणी बहरल्याचे समाधान होतं…पण हातातोंडाशी आलेला घास परतीच्या वादळी पावसाने हिरावून घेतलाय…पुरती वाताहात उडालीय…कापलेलं पिक कुठं पाण्यात तरंगतेय…कुठे पाण्याच्या लोंढय़ात वाहून गेलेय…आता तर त्याही पुढे त्या पिकांच्या लोंब्यावर, कणसांच्या दाण्यांना नव्याने कोंब उगवल्याने रत्नागिरीतील शेतकरी अस्मानी संकटापुढे पुरता गलीतगात्र झाला आहे.
कोकण किनारपट्टीवर कमी दाबाच्या पटय़ामुळे कोसळणाऱया पावसानं रत्नागिरी जिह्यातील भातशेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या 72 तासाहून अधिक काळ कोकणातली भातशेती पुरती पाण्याखाली आहे. अनेक ठिकाणी पिकांची कापणी करून ठेवलेली होती. पण कापलेलं शेतही पाण्यात गेली आहेत. या अस्मानी संकटापुढे डोळ्यात आसू घेवून जिह्यातील शेतकरी हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने हवालदिल झाला आहे.
जिल्हय़ात 68 हजार हेक्टर भातशेतीचे तर 9 हजार हेक्टर नाचणी पिकाचे क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे 60 टक्के पिकांची या पावसामुळे पुरती नासाडी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. जिल्ह्य़ात धुमशान घातलेल्या वादळी पावसाने शुक्रवारी दुपारपासून काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. पण आता येथील शेतीचे जे विदारक चित्र समोर आलेय. गेले 3-4 दिवस पावसाच्या झंझावातासमोर घरात डोक्याला हात टेकून बसलेला शेतकरी आता झालेली दुरवस्था पाहण्यासाठी शेतात जात आहे. समोरचे चित्र पाहून साऱया मेहनतीवर पाणी फेरल्याचे पाहून त्याचे मन सुन्न होत आहे. जिह्यातील भात असो वा नाचणीची शेती असो, झालेलं नुकसान खूप मोठं आहे. कुणी शेतकरी पाण्यात भिजत असलेलं कापलेलं भात उचलतोय…तर कुणी भिजलेलं भात लगेचच शेतात ताडपत्री पांघरून ते झोडण्यात व्यस्त झालाय…तर कुणी ताडपत्री, कागदाखाली झाकून ठेवलेले भाताचे भारे, पेंडकी उचलून नेण्याची धांदल करत असल्याचे चित्र प्रत्येक ठिकाणी अनुभवयास मिळत आहे. त्यावेळी शेताच्या बांधावरून या भरून न निघणाऱया या नुकसानीचे चित्र व्यक्त करताना शेतकऱयांच्या भावनाही अनावर होताना दिसत आहेत.
संपूर्ण जिल्ह्य़ासह रत्नागिरी तालुक्यात सर्वत्रच भातशेतीचे हे विदारक वास्तव पहावयास मिळत आहे. त्यात अगदी जयगड, खंडाळा, जाकादेवी, मालगुंड, कोतवडे, शिरगांव, करबुडे, मिरजोळे, हातखंबा, निवळी, बावनदी, पाली, चांदेराई, हरचेरी, पोमेंडी, काजरघाटी, सोमेश्वर, कोंडवी, टिके, कुरतडे, पावस, अशा सर्वच भागात शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नदीकिनारी, तसेच पऱया, नाल्यालगत सखल भागात व पाणथळीच्या जागी असलेल्या भातशेती पूर्ण पाण्याखाली तर अनेक ठिकाणी वाहून गेली आहे.
कोंडवी, निवळी, टिके येथे चक्क पावसात भिजत शेतकऱयांनी कापलेलं भात मोकळ्या मैदानात आणून सूखत ठेवलं. शुक्रवारी सकाळी ढगाळ वातावरण होत. तरीही नव्या उमेदीने शेतकरी सकाळी 7 पासून शेतात खपत होते. भिजलेल्या भातातून काहीच मिळणार नाही, हे माहिती असूनही आशेने भिजलेले भात गोळा करत होते. तांदूळ मिळणार नाहीत, पण किमान कणी तरी होईल. पेंढा मिळाला नाही तरी भिजलेले भात सुकवून ठेवू. अशा आशेने शेतकयाचे हात शेतात राबत आहेत. काजरघाटी येथील शेतकऱयांनी भात झोडून घेण्यास सुरुवात केली आहे.
अनेक शेतात कापून ठेवलेले पीक वाहून गेले. वर्षभर कुटुंबाला पुरेल, या हेतूने शेतकरी रक्त आटवून घाम गाळून केलेल हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या कोपामुळे वाहून गेले. कापलेले भात सुरक्षितपणे घरात आणता आले नाही तर काहींनी पावसामुळे कापले नव्हते ते सर्व पीक आडवे पडले व तिथेच रुजले. त्यामुळे या बळीराजाला आता सरकारकडून भरीव मदतीची गरज आहे.









