‘ओरियन’ अंतराळयान 14 लाख मैल प्रवास करून परतले ः पॅराशूटच्या मदतीने पॅसिफिक महासागरात अवतरण
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकन स्पेस एजन्सी नासाची ‘आर्टेमिस-1’ चंद्र मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली. रविवारी रात्री 11.10 वाजता ओरियन अंतराळयान 14 लाख मैलांचा प्रवास करून पृथ्वीवर परतले. त्याचे लँडिंग मेक्सिकोच्या ग्वाडालुप बेटाजवळ पॅसिफिक महासागरात झाले. नासाने 25 दिवसांपूर्वी 15 नोव्हेंबरला तिसऱया प्रयत्नात ही मोहीम सुरू केली होती. नासा आता पुढील मोहीम 2024 मध्ये लॉन्च करण्याची योजना आखत आहे.
चंद्राला प्रदक्षिणा घालून ओरियन अंतराळयान 26 दिवसांनंतर पृथ्वीवर परतले आहे. अमेरिकन अंतराळ संस्थेसाठी ही एक मोठी कामगिरी मानली जात आहे. ओरियनचा पृथ्वीवरील प्रवेश विशेष आहे. पहिल्यांदाच ‘स्किप एन्ट्री’ तंत्राचा अवलंब करून पृथ्वीवर लँडिंग करण्यात आले. या प्रक्रियेत तीन टप्पे होते. ओरियनने प्रथम पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या भागात प्रवेश केला. यानंतर ते आत असलेल्या कॅप्सूलच्या मदतीने वातावरणातून बाहेर आले. शेवटी पॅराशूटद्वारे वातावरणात परत आले. स्किप एंट्री दरम्यान स्पेसक्राफ्टचे क्रू मॉडय़ूल आणि सर्व्हिस मॉडय़ूल एकमेकांपासून वेगळे झाले. सर्व्हिस मॉडय़ूल आगीत जळून खाक झाले, तर क्रू मॉडय़ूल पॅराशूट करून त्याच्या नेमलेल्या जागी परतले. वातावरणात पुन्हा प्रवेश करताच त्याचा वेग लक्षणीयरित्या कमी झाला.
पुढील मोहिमेसाठी ओरियनचे लँडिंग आवश्यक
नासाचे आर्टेमिस-1 मिशन एक चाचणी उड्डाण होते. आता ‘आर्टेमिस-2’ मिशनमध्ये नासा अंतराळवीर पाठवण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञांनी ओरियनच्या पृथ्वीवर उतरण्यावर बारीक नजर ठेवली होती. याशिवाय स्किप एंट्री हे नासाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान असून ओरियन हा त्याचा पहिलाच प्रयत्न होता. आता चाचणी उड्डाणाच्या निकालावर पुढील उड्डाणाची तयारी अवलंबून आहे.
आर्टेमिस मोहिमेचा खर्च 7,434 अब्ज रुपये
2012 ते 2025 या कालावधीत ‘नासा’ कार्यालयाच्या महानिरीक्षकांच्या लेखापरीक्षणानुसार, या प्रकल्पासाठी 93 अब्ज डॉलर्स म्हणजे 7,434 अब्ज रुपये खर्च अपेक्षित आहे. एकंदर प्रत्येक फ्लाईटची किंमत 4.1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 327 अब्ज रुपये असेल. या प्रकल्पावर आतापर्यंत 37 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2,949 अब्ज रुपये खर्च झाले आहेत.
अशी झाली आर्टेमिस-1 मोहीम
आर्टेमिस-1 हा या प्रकल्पाचा पहिला टप्पा होता. त्याअंतर्गत नासाचे नवे स्पेस लाँच सिस्टिम अर्थात एसएलएस रॉकेट ओरियन अंतराळयानाला घेऊन अवकाशात झेपावले होते. एक मीटर रुंद आणि पाच मीटर लांब असलेल्या या यानात मानवाकृती पुतळेही ठेवण्यात आले होते. त्यांना कमांडर मॅनिकिन कँपोस, हेल्गा आणि जोहार अशी नावे देण्यात आली होती. आर्टेमिसच्या पुढच्या मोहिमांमध्ये वापरण्यासाठी तयार केलेले स्पेससूट्स आणि इतर गोष्टींची तपासणी या मोहिमेत करण्यात आली.
2025 किंवा 2026 मध्ये मानव चंद्रावर जाणार
अमेरिका 53 वर्षांनंतर पुन्हा एकदा आर्टेमिस मिशनद्वारे मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे. त्याचे तीन भाग केले आहेत. आर्टेमिस-1, 2 आणि 3 अशा तीन टप्प्यात ही मोहीम आखली जात आहे. आर्टेमिस-1 ने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली, काही छोटे उपग्रह सोडले आणि चंद्राचे अनेक महत्त्वाचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. आता आर्टेमिस-2 2024 च्या आसपास लॉन्च होईल. यात काही अंतराळवीरही जातील, पण ते चंद्रावर पाऊल ठेवणार नाहीत. चंद्राच्या कक्षेत फिरल्यानंतरच ते परत येतील. या मोहिमेचा कालावधी अधिक असेल. यानंतर, अंतिम मिशन आर्टेमिस-3 रवाना केले जाईल. यामध्ये जाणारे अंतराळवीर चंद्रावर उतरतील. हे मिशन 2025 किंवा 2026 मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. पहिल्यांदाच महिलाही मून मिशनचा भाग असणार आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेले पाणी आणि बर्फ यावर अंतराळवीर संशोधन करणार आहेत.
आर्टेमिस हे 50 वर्षांच्या अपोलो मिशनपेक्षा वेगळे
अपोलो मिशनचे शेवटचे आणि 17 वे उड्डाण 1972 मध्ये झाले. सोव्हिएत युनियनला पराभूत करण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जेएफके यांनी या मिशनची कल्पना केली होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेला जगात पहिले स्थान मिळवून देणे हे त्यांचे ध्येय होते. मात्र, जवळपास 50 वर्षांनंतर वातावरण वेगळे आहे. आता अमेरिकेला आर्टेमिस मिशनद्वारे रशिया किंवा चीनला हरवायचे नसून नासाचा उद्देश पृथ्वीच्या बाहेर असलेल्या गोष्टींचा सखोल अभ्यास करणे हा आहे. चंद्रावर जाऊन तेथील बर्फ आणि मातीपासून इंधन, अन्न आणि इमारती बनवण्याचा शास्त्रज्ञांना प्रयत्न करायचा आहे.









