स्टार एअरला उडान-3 अंतर्गत मार्ग मंजूर : बेळगावहून प्रवाशांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
बेंगळूर व सुरत या शहरांना विमानसेवा सुरू करणाऱया स्टार एअरने आता नाशिक व जोधपूर शहरांना विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. स्टार एअरला हे दोन्ही मार्ग उडान-3 अंतर्गत मंजूर झाले होते. लवकरच या शहरांना बेळगावमधून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
स्टार एअरने यापूर्वी बेळगावमधून मुंबई, इंदूर, अहमदाबाद, सुरत, बेंगळूर व अजमेर या शहरांना विमानसेवा सुरू केली होती. स्टार एअरच्या ताफ्यात आणखी एक विमान दाखल झाल्यामुळे बेळगाव विमानतळावर दोन विमानांचे नाईट पार्किंग केले जात आहे. बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱया प्रवाशांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्यामुळे नव्या शहरांना विमानसेवेने जोडले जात आहे. याचा फायदा बेळगाव शहराच्या विकासालाही होताना दिसत आहे.
सर्वसामान्यांना विमान प्रवास करता यावा यासाठी केंद्र सरकारने उडान योजना अंमलात आणली. या योजनेमुळे कमी तिकीट दरात प्रवाशांना विमान प्रवास करता येत आहे. टू व थ्री टायर शहरांना जोडण्यासाठी या योजनेतून प्रयत्न केले जात आहेत. उडानमुळेच बेळगावला आतापर्यंत दहा शहरांना विमानसेवेद्वारे जोडण्यात आले आहे. उडान-3 अंतर्गत स्टार एअरला बेळगावमधून जयपूर, जोधपूर, नागपूर, नाशिक व तिरुपती असे मार्ग मंजूर झाले आहेत.
आणखी एक विमान स्टार एअरच्या ताफ्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील नाशिक व राजस्थानमधील जोधपूर शहराला विमानसेवा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. स्टार एअरने या दोन्ही शहरांना विमानसेवा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. असे झाल्यास बेळगावमधून बारा शहरांना थेट विमानसेवेद्वारे जोडले जाणार आहे. या दोन शहरांना आता विमानसेवा केव्हा सुरू होणार याची उत्सुकता शहरवासियांसह प्रवाशांनाही लागली आहे.









