ऑनलाईन टीम / नाशिक :
नाशिकमधील 847 उत्तरभारतीयांना घेऊन दुसरी ‘श्रमिक विशेष’ ट्रेन आज सकाळी लखनऊकडे रवाना झाली.
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर सर्व मजुरांना विशेष बसद्वारे आणण्यात आले. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत त्यांना ट्रेनमध्ये बसवण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आदी यावेळी उपस्थित होते. भुजबळ यांनी हिरवा झेंडा दाखवून उत्तरभारतीय मजुरांना निरोप दिला. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या तसेच ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.
नाशिकहून शुक्रवारी रात्री 9.30 वाजता भोपाळला पहिली विशेष ट्रेन रवाना झाली. त्यानंतर लखनऊसाठी दुसरी ट्रेन रवाना होणार होती. मात्र, उत्तरप्रदेश सरकारने काल परवानगी नाकारल्याने आज सकाळी ही ट्रेन सोडण्यात आली.
लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यात अडकलेल्या कामगार आणि मजुरांना मूळ गावी पाठविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्यानुसार परराज्यातील मजुरांसाठी कालपासून या विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत.









