ऑनलाईन टीम / नाशिक :
नाशिकमध्ये मागील 15 वर्षांपासून बंद असलेल्या एका गाळय़ात मानवी अवयव आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पाठीमागील सोसायटीमध्ये हा प्रकार उघडकीस आला. केमिकल प्रक्रिया करुन हे अवयव ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिकमध्ये मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुंबई नाका पोलीस स्टेशनलगतच्या हरी विहार बिल्डिंगच्या बंद गाळ्यात हे अवयव बादल्यांमध्ये आढळले आहेत. मानवी डोकं, हात, कान व अन्य शारिरीक अवयव या बादल्यांमध्ये आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी अवयव संकलन करतात, त्याच पद्धतीने ते संकलित व साठवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
फॉरेन्सिक डॉक्टरांच्या टीमने हे अवयव तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी गाळेधारकाकडे विचारणा केली असता त्याने याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले. जवळपास पंधरा वर्षापासून गाळे बंद असल्याचा गाळाधारकाने दावा केला आहे.