लष्करी जवान शिवाजी आनंद तळवार यांचे अपघाती निधन
किणये/ वार्ताहर
नावगे गावचा सुपुत्र, लष्करी जवान शिवाजी आनंद तळवार (वय 38) यांचे रविवारी रात्री बेंगळूर-होन्नावर रस्त्यावर अपघाती निधन झाले. ते सुटीनिमित्त महिनाभर नावगे येथे आपल्या गावी आले होते. रविवारी सकाळी गावातून दुचाकी घेऊन म्हैसूरकडे निघाले असताना रात्री आठच्यादरम्यान त्यांच्यावर काळाने घाला घातला. गावचा जवान अपघातात ठार झाल्यामुळे नावगे गावावर शोककळा पसरली आहे.
मंगळवारी सकाळी शिवाजी यांचे पार्थिव लष्करी वाहनातून नावगे येथे आणण्यात आले. आपल्या भागातील लष्करी जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी नावगे पंचक्रोशीतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तिरंग्यात लपेटलेले पार्थिव पाहून आई-वडील, पत्नी व भाऊ यांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावत होती.
शिवाजी हे 68 मीडियम रेजिमेंट तोफखाना युनिटमध्ये गेल्या 19 वर्षांपासून सेवा बजावत होते. सिकंदराबाद, जम्मू-काश्मीर, राजस्थान, देवळाली, पंजाब या ठिकाणी त्यांनी देशाची सेवा केली. दोन महिन्यांपूर्वीच त्यांची म्हैसूर येथे बदली झाली होती. त्यांना हवालदारपदी बढती मिळाली होती. महिनाभरापूर्वी आपल्या नावगे गावी सुटीनिमित्त आले होते.
सुटी संपवून रविवारी सकाळी कुटुंबीयांचा निरोप घेऊन ते दुचाकीवरून म्हैसूरला रवाना झाले. मात्र, याच दिवशी रात्री म्हैसूरनजीक त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांचे मोठे भाऊ यल्लाप्पा यांनी रविवारी रात्री भाऊ शिवाजी यांना फोन केला. मात्र, देरूर स्टेशनच्या पोलिसांनी शिवाजीचा फोन उचलून भाऊ यल्लाप्पा यांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे रात्री नावगे गावातील त्यांचे भाऊ व नातलग म्हैसूरला रवाना झाले. पंचनामा व इतर प्रक्रिया केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मंगळवारी सकाळी लष्करी वाहनातून त्यांचे पार्थिव नावगे गावात आणण्यात आले.
जवानाला निरोप देण्यासाठी गावच्या वेशीत भव्य मंडप उभारण्यात आला होता. मंडपात दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. ऑर्डिनरी कॅप्टन एस. के. सिंग, हवालदार कुमारस्वामी, सुभेदार महादेव अवताडे, हवालदार जाकेश, ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, डेप्युटी तहसीलदार काद्री, सर्कल धापळे, तलाठी एम. एच. बुदीहाळ, मारुती हुरकाडली, मारुती हुंबरवाडी, नागाप्पा तुर्केवाडी, लक्ष्मण पाटील, सूर्यकांत कर्लेकर, लक्ष्मण कामती, परशराम सुरतकर, चांगाप्पा यळ्ळूरकर, कृष्णा बेळगावकर, अरुण गुरव, लक्ष्मण शहापूरकर, परशराम नाईक, परशराम शहापूरकर, यल्लाप्पा मुद्दी, के. के. बेळगावकर, शाळेचे मुख्याध्यापक सुतार आदींसह परिसरातील नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.
पार्थिवाची मिरवणूक काढण्यात येणार असल्यामुळे गावातील सर्व गल्ल्यांमध्ये रांगोळी रेखाटण्यात आली होती. ठिकठिकाणी भगव्या पताका बांधलेल्या होत्या. जवानाच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करून सारेच श्रद्धांजली वाहत होते. मिरवणुकीसाठी ट्रक्टर हारांनी सजविण्यात आला होता. ‘अमर रहे अमर रहे लष्करी जवान अमर रहे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. जवानाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
स्मशानभूमीत सातेरी कामती, शिवबसाप्पा हिरेबिल, बसाप्पा गवळी, शिक्षक विनय पाटील, कर्ले येथील क्रीडा शिक्षक प्रकाश शेळके, आण्णाप्पा पाटील, नरसिंग देसाई आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. 26 कर्नाटक बटालियन व 68 मीडियम रेजिमेंट तोफखाना या लष्करी जवानांच्या उपस्थितीत लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठे भाऊ यल्लाप्पा यांनी भडाग्नी दिला.
लष्करी सेवेत जाण्याचे होते स्वप्न
शिवाजी हा एका गरीब कुटुंबातील मुलगा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. आई-वडील मोलमजुरीची कामे करायचे. शिवाजीला लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. आपल्या इच्छाशक्तीच्या व जिद्दीच्या जोरावर तो वयाच्या 19 व्या वर्षी सैन्यात भरती झाला. आपला मुलगा देशसेवेत रुजू झाल्यामुळे त्याच्या आई-वडिलांना आपण केलेल्या कष्टाचे सार्थक झाले, असे वाटले. मात्र, त्याच्या अपघाती निधनाची बातमी ऐकल्यानंतर त्या भोळय़ाभाबडय़ा माता-पित्याने हंबरडाच फोडला होता.
19 वर्षे केली देशसेवा
सीमेवर लष्करी जवान डोळय़ात तेल घालून देशसेवा करतो म्हणूनच आपण सर्वजण शांत झोपू शकतो. नावगे गावातील अनेक युवक लष्करी सेवेत आहेत. शिवाजी तळवार यांनीही 19 वर्षे देशाची सेवा केली. मात्र, त्याचे अपघाती निधन झाल्याने ही घटना सर्वांनाच चटका लावून जाणारी ठरली.
रविवार सकाळची भेट ठरली अखेरची…
शिवाजी हे म्हैसूरला जाण्यासाठी रविवारी सकाळी तयार झाले. आईने बनविलेली भाजी-भाकरी खाल्ली व आई-वडिलांचा आशीर्वाद घेतला. पत्नीला सांगून ते देशसेवा बजाविण्यासाठी नावगे गावातून दुचाकीवरून म्हैसूरकडे रवाना झाले. मात्र, त्याच रात्री आई-वडिलांच्या कानावर मुलाचा अपघात झाल्याची वार्ता समजल्यानंतर सारे काही सुन्न झाले होते. कुटुंबीयासाठी रविवार सकाळची भेट अखेरचीच ठरली.









