महापालिका की नागरिक? : शास्त्रीनगर नाल्याचा पावसाळय़ात धोका
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील नाल्यांची स्वच्छता दरवर्षी पावसाळय़ापूर्वी करण्यात येते, असा दावा मनपाकडून करण्यात येतो. एकीकडे नाल्याची स्वच्छता केली जात नसल्याचा आरोप नागरिक करीत असतात, दुसरीकडे नागरिकच नाल्यामध्ये कचरा टाकत असतात. त्यामुळे नेमकी चूक कुणाची, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. सध्या शास्त्राrनगर नाला पाण्याच्या बाटल्या आणि कचऱयाने भरल्यामुळे नाल्याची स्वच्छता करण्यात आली नसल्याने पावसाळय़ाच्या प्रारंभीच कचरा अडकून नाल्याचे पाणी नजीकच्या घरांमध्ये शिरण्याचा धोका आहे.
घरोघरी जाऊन कचरा जमा केला जातो. तरीही नाला कचऱयाने तुडूंब भरत आहे. शास्त्राrनगर नाल्याची स्वच्छता करण्यात आली नसल्याने नाला काठावरील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरत असल्याचा आरोप नागरिक करीत असतात. दरवषी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक पावसाळय़ात नाल्याला पूर येत असल्याने नागरिकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याचे कारण पाहता नाल्यामध्ये टाकण्यात येणारा कचरा कारणीभूत आहे. एकीकडे नाल्याची स्वच्छता केली जात नसल्याचा आरोप नागरिक करीत असतात, दुसरीकडे नागरिकच नाल्यामध्ये कचरा टाकत असतात. गटारी आणि नाल्यामध्ये कचरा टाकू नका, असे आवाहन मनपाच्यावतीने दररोज करण्यात येते. पण रोज मरे त्याला कोण रडे असा दृष्टिकोन शहरवासियांचा झाला आहे. त्यामुळे कचरा घेणारे कर्मचारी किंवा वाहन आले नसल्यास कचरा नाल्यामध्ये टाकला जातो.
कचरा उचलीस टाळाटाळ
काही हॉटेल्स व व्यावसायिक आस्थापनांमध्ये मोठय़ा प्रमाणात कचरा जमा होतो. सदर कचऱयाची उचल करण्यास स्वच्छता कर्मचारी टाळाटाळ करीत असतात. त्यामुळे व्यावसायिक हा कचरा नाल्यामध्ये किंवा रस्त्याशेजारी टाकतात. मराठा कॉलनी, नानावाडी परिसरात अशा प्रकारे नाल्यामध्ये दररोज कचरा टाकला जातो. काही नागरिक नाल्यामध्ये कचरा टाकत असतात. त्यामुळे शास्त्राrनगर पहिला क्रॉस ते तिसऱया क्रॉसपर्यंत नाल्यामध्ये कचरा साचला असून पाण्याच्या बाटल्या व प्लास्टिक कचऱयाने नाला तुडूंब भरला आहे.
सदर कचऱयाची उचल करण्याकडे महापालिकेच्या स्वच्छता विभागाने कानाडोळा केला आहे. जर पावसाळय़ापूर्वी नाला स्वच्छता मोहीम राबविण्यात आली नसल्यास पावसाळय़ाच्या प्रारंभीच कचऱयामुळे नाल्याला पूर येण्याचा धोका आहे. त्यामुळे नाल्याची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.









