मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तळीये गावाला भेट दिली. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राज्य सरकारची लोकं भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला आहे. आता फिरत आहेत”, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. आता नारायण राणेंच्या टीकेला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चांगलेच उत्तर दिलं आहे.
“आपण विरोधकांच्या टीकेवर लक्ष केंद्रीत केलं तर आपण काहीच करू शकणार नाही. आता आपल्याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणं गरजेचं आहे. लोकांच्या पाठी उभं राहणं गरजेचं आहे”, असं उत्तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलं.
नारायण राणे नेमके काय म्हणाले ?
अतिवृष्टीने कोकणावर पुरपरिस्थिती ओढवली. मुसळधार पावसाने कोकणात हाहाकार उडाला. यात मालमत्तेबरोबरच प्रचंड जीवित हानी झाली. तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळली. या घटनेनंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी तळीये गावाला भेट दिली. दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नारायण राणे म्हणाले की, “केंद्र सरकारकडून आधीच मदत जाहीर केली आहे. पंतप्रधानांनी मला पाहणीसाठी पाठवलं आहे. त्यांनी मला पाहणी करून अहवाल देण्यास सांगितलं आहे. सध्या तरी मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. त्याचबरोबर घटनेतून वाचलेल्या लोकांचं पुनर्वसन करण्याचं काम केलं जात आहे,” असं राणे यांनी सांगितलं. यावेळी राज्य सरकारशी यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. “राज्य सरकारची लोक भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला आहे. आता फिरत आहेत”, अशा शब्दात राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.