मुंबई/प्रतिनिधी
मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ४ खासदारांची वर्णी लागली आहे. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे मंत्री महाराष्ट्रातून जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा येत्या १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यावेळी नारायण राणे शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं दर्शन घेणार आहेत. राणे पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोकणात शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठीच राणेंची ही खेळी असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा येत्या १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याच दिवशी ते दिल्लीतून मुंबईत येणार आहेत. त्यामुळे विमानतळाहून ही जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. त्यानंतर राणे थेट शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं दर्शन घेतील आणि तेथून ते दादरला जातील. राणे पहिल्यांदाच बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाणार आहेत. त्यामुळे शिवसेनेची काय भूमिका किंवा शिवसेना नेत्याच्या काय प्रतिक्रिया असणार हे पाहावं लागणार आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचीही जन आशीर्वाद यात्रा निघणार आहे. काही दिवसापूर्वी मंत्री भागवत कराड यांचीही जन आशीर्वाद यात्रा निघणार असून या जन आशीर्वाद यात्रेतून बीडला वगळण्यात आलं आहे अशी बातमी होती. बीड सोडता मराहाष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ही आशीर्वाद यात्रा पोहोचणार आहे. त्यामुळे आशीर्वाद यात्रेतून बीडला का वगळलं? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सोबतच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.