मुंबई \ ऑनलाईन टीम
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना आमच्यात घेऊ, असा गौप्यस्फोट केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणेंच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. बाडगा असतो तो कोडगा असतो. शिवसेनेवर टीका करण्यासाठीच भाजपने बुजगावणे पुढे केले आहे, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.
विनायक राऊत म्हणाले की, बाडगा जो असतो तो कोडगा असतो. भाजपने शिवसेनेवर टीका करण्यासाठी नारायण राणेंचे बुजगावणे पुढे केलं आहे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यास सांगितलं. परंतु, पंतप्रधानाच्या या आवाहनाला राणेंनी हरताळ फासला. जन आशीर्वाद यात्रेतून राणेंनी लोकांचे किती प्रश्न समजवून घेतले?, असा सवाल राऊत यांनी केला.
स्वार्थासाठी शिवसेनेशी बेईमानी केलेल्या राणेंना इतर सुद्धा तसेच दिसतात. याच भावनेमुळे एकनाथ शिंदेवर राणेंनी आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत. शिंदे मंत्रीपदाला न्याय देत आहेत. पक्ष संघटना सुद्धा मजबुत करण्याचे काम करत आहेत, असं सांगतानाच स्वतःच्या अनुभवावरून इतरांना मोजणे हा नारायण राणेंचा गुणधर्म असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली. राणेंना ठोकम ठोकी करायची सवयच आहे. शिंदे शिवसेनेसाठी अभिमान असणारे मंत्री आहेत, असं गौरवोद्गारही त्यांनी काढलं.
यावेळी त्यांनी राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवरही टीका केली. राणेंची ही यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. या यात्रेमुळे राणे तिसरी लाट कोकणात घेऊन येत आहेत. कोकणवासीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावाही त्यांनी केला.
Previous Articleदानवेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा
Next Article तालिबानला मान्यता नाहीच…








