(अध्याय चौथा)
जनक महाराजांना ईश्वराच्या अवतारांबद्दल अत्यंत कुतूहल होते म्हणून त्यांनी अर्षभाना विनंती केली की, ‘भगवंतांच्या अवताराबद्दल मला माहिती द्या. त्यांची अगाध थोरवी मला सांगा. त्रिभुवनात देव तर एक आहे पण अवतार मूर्ती किती? जे मागे होऊन गेले व पुढे होणार आणि हल्ली आहेत ते सारे अवतार मला सांगा.’ राजाच्या प्रश्नाचे उत्तर जयंती नंदन ‘द्रुमिलमुनी’ सांगू लागले. ते म्हणाले, ईश्वराच्या सामर्थ्याबद्दल काय आणि किती सांगेन तेवढे थोडेच आहे कारण ज्याच्या नखातसुद्धा अनंत लीलाशक्ती राहतात त्याच्या सर्व गुणांची गणना कोण करू शकेल? तथापि, जेवढे माहीत आहे तेवढे सांगतो. प्रथम ईश्वराने नारायण अवतार घेऊन आत्मशक्तीने पंचमहाभुतांच्या सहाय्याने विश्वाची निर्मिती केली. नारायण बद्रिकाश्रमात राहतात. त्यांचा प्रताप, नि÷ा व दृढ तप पाहून इंद्र त्याचे स्sिंाहासन आता जाते की काय असे वाटून घाबरला. त्याने नारायणाचा तपोभंग करायचे ठरवून वसंत, काम क्रोध आदींना पाठवले, पण ते नारायणाचा तपोभंग करू शकले नाहीत. उलट नारायणानेच त्यांचा अतिथी समजून आदर सत्कार केला. त्यावर त्यांनी नारायण हा दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे हे जाणले आणि आपण कशासाठी आलो होतो हे आठवून त्याची त्या सर्वांना लाज वाटली. खजील होऊन ते नारायणाची स्तुती करू लागले. आत्तापर्यंत सर्वांचा छळ करणारे काम आणि क्रोध नारायणाची पूर्ण शांती पाहून त्यांच्या शांतीची स्तुती करू लागले. ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, नारद, मारुती इत्यादींचा पुराणातल्या अनेक कथांचा संदर्भ देऊन काम म्हणाला, ‘भल्याभल्यांना मी रंजीस आणले आहे पण माझा प्रभाव नष्ट करून आपण माझा पराभव केलात. आपल्या शांतीने आपण मला जिंकलेत क्रोधालाही शांत केलेत. वासनेचा तोराही कायमचा घालवून टाकलात. आपली ही नि÷ा इतर तपस्व्यांना साधत नाही. मग या संदर्भातही पुरणातले अनेक दाखले त्यांनी दिले. त्यामध्ये नारद, गणेश, दुर्वास इत्यादींची नावे निघाली. खरं म्हणजे काम आला की क्रोध पाठोपाठ येतोच! एवढे असून आपल्याला कसला गर्व म्हणून नाही आणि अहंकारही नाही. नारायणा, तपस्वी जनांना छळावे हा आमचा स्वभाव आहे. ढोंगी लोकांना आम्ही बरोबर वठणीवर आणतो. आता आपल्या निष्काम भक्तांची कथा सांगतो. हे भक्त मोठे होऊन आपले स्थान ग्रहण करतील या भीतीने देव त्यांच्यापुढे अनेक विघ्ने उभी करतात. पण आपण त्यांचे संरक्षण करत असल्याने त्यांना विघ्नांची भीती नसते. जे सकाम भक्ती करतात ते मनात हेतू ठेवूनच कार्य करतात त्यामुळे ते मला (कामाला) आधीच वश झालेले असतात आणि जे मला वश झालेले असतात ते तपाचा व्यय करून भोग भोगतात आणि जे क्रोधाच्या हाती सापडतात ते तपालाच मुकतात. प्राणायाम आदी योग्य साधना करणारे आपण कामाला जिंकले आहे असे समजून निष्काम भावाच्या अभिमानाने उन्मत्त होतात. साहजिकच थोडय़ाशा अपमानाने क्रोधीत होऊन शाप देऊन स्वतःची नि÷ा व तपसंपत्ती गमावून बसतात.’ असे हे काम क्रोध अभक्तांना छळतात. मात्र हरिभक्तांपुढे त्यांचे काही चालत नाही. कामाचे असे बोलणे चालू असताना भगवंतानी लीला केली. त्यांनी कोणता चमत्कार केला ते आपण उद्या पाहू …
क्रमशः







