(अध्याय दुसरा)
पूर्णप्राप्ती करून घेतलेले भक्त कसे वागतात ते सांगताना नाथमहाराज म्हणतात, अशा भक्तांना सगळीकडे भगवंतच दिसत असतो. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन वागण्यामध्ये मान, अपमान, नफा, तोटा या वागण्यांना स्थान नसते. साहजिकच त्यांचे वागणे बोलणे चारचौघासारखे असत नाही. त्यांना अवलिया म्हणणे योग्य ठरेल. हे भक्तांचे शुद्ध लक्षण होय. त्यांची विचारसरणी अशी असते की, सर्व प्राणिमात्रांमध्ये भगवंत आहे. त्याहीपुढे जाऊन सर्व प्राणिमात्र भगवंताचाच अंश आहेत आणि हा जो भगवंत आहे, तो मीच आहे अशी त्यांची पक्की धारणा असते आणि यात कुठेही आत्मप्रौढी नसते कारण ही त्याच्या मनाची सहजावस्था होय. असा भक्त ज्याला सगळय़ांच्यातला भगवंत स्पष्ट दिसत असतो त्याला उत्तमोत्वाचा मान मिळून श्रे÷ अवतार मानतात. भगवंत त्याला अग्रगण्य योगी, ज्ञानशिरोमणी, सिद्धांचा मुकुटमणी अशी विशेषणे देऊन गौरवतात. अशांच्या मनामध्ये विषयसेवन करत असताना सुखदुःखाचे विचार येत नाहीत. मग ते विषयसेवन का करत असतात हा प्रश्न येतो तर त्याचे उत्तर असे की, प्रारब्ध कर्म अतिशय बलवान असते ते भक्तांकडून विषयसेवन करवते. पण त्यांना देहबुद्धी नसल्याने सुख दुःख होत नाही.
देह, इंद्रिय, मन, बुद्धी आणि प्राण ही मानवी देहाला जखडून ठेवणारी पाच स्थाने आहेत. या स्थानामुळे माणसाला भूक, तहान, भय, वेदना, जन्म आणि मरण यांचा सामना करावा लागतो. यासाठी अपार कष्ट करावे लागतात. त्यालाच संसार म्हणतात.सर्वसामान्य माणूस हा वरील बाबीमुळे कायम त्रस्त असतो. पण अगाध स्थितीत असलेल्या भक्ताच्या हृदयातले परमेश्वरी चैतन्य जागृत असल्याने त्याला भूक, तहान, भय या बाबी जाणवतच नाहीत. मनोमंदिरात भगवंताची मूर्ती असल्याने इतरांना जाणवत असलेल्या भविष्यकालीन भयाची समाप्ती झालेली असते. त्याला भूक लागली किंवा तहान लागली की, त्या त्या जागी नारायण प्रकट होतो आणि त्याची ती इच्छा संपून जाते. त्याच्या ज्ञानेंद्रियांना आपल्या जवळच नारायणाचा वास आहे याची सतत जाणीव होत असते. प्रत्येक दृश्यामध्ये, ऐकू येणाऱया आवाजामध्ये, नाकाला येणाऱया वासामध्ये, प्रत्येकाच्या स्पर्शामध्ये नारायणाची उपस्थिती त्याला जाणवत असते. त्यामुळे देहाच्या दैनंदिन हालचाली परमेश्वराच्या अस्तित्वाने, त्याच्यामार्फत म्हणजेच आपल्या दृष्टीने आपोआपच पार पडत असतात. अशा भक्ताला जन्म मरणाची काय पर्वा? त्याला कसलाही लोभ नसतो. ना मान सन्मानाची अपेक्षा! कसलीही अहंता नाही. त्याला आनंद वाटावा म्हणून देव स्वतः राबत असतात. तो जिकडे जाईल त्याच्या पाठोपाठ देव जात असतात. ते त्याच्या हृदयात वास करतात. आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मुखातून चुकून जरी हरीचे नाम आले तरी ते सर्व पातकांचा नाश करते. साधक आनंदाने अखंड हरिनामाचा गजर करतात त्यांचा संसार आनंदाचा होतो.
(द्वितीय अध्याय समाप्त)
क्रमशः







