कोणत्याही समाजात संकट येऊन गेले की परिस्थिती पूर्वपदावर आल्याची अनेक लक्षणे असतात. लोकांच्या तात्पुरत्या गाडून टाकलेल्या सवयी उफाळून वर येतात. आटपाट नगर याला अपवाद नाही. इथे नुकतीच कोरोनाची साथ आलेली. ती अजून ओसरली नाही. पण ती न ओसरता परिस्थिती पूर्वपदावर आल्यासारखी वाटते. थोडक्मयात काय, तर लोक कोरोनाबरोबर जगायला शिकलेले दिसतात.
ओडिसी नावाच्या ग्रीक महाकाव्यात एक कथा आहे. युद्धावर गेलेला युलिसिस राजा अद्याप परतलेला नसतो. राणी पेनेलोपी पतिव्रता आहे. पतीची वाट बघते आहे. आसपासच्या राजांना वाटते की युलिसिस आता परत येणार नाही. म्हणून सगळे राजे तिच्या महालाबाहेर तळ ठोकतात आणि तिला फर्मावतात की तू युलिसिसला विसर आणि आमच्यातील एकाशी विवाहाला तयार हो. पेनेलोपी युलिसिसशी प्रामाणिक आहे. ती या सर्व राजांना फसवण्यासाठी एक गालीचा विणायला घेते आणि जाहीर करते की हा गालीचा विणून झाल्यावर मी तुमच्यातील एकाची पती म्हणून निवड करीन. पण सगळे शांत होतात.
पेनेलोपी दिवसा गालीचा विणत राहते. पण रात्री गुपचूप विणलेला गालीचा उसवते. त्यामुळे गालीचा कधीच पूर्ण होत नाही. यथावकाश युलिसिस परत येतो आणि सर्व राजांना हाकून लावतो.
आटपाट नगरात पेनेलोपीसारखेच एक आमदार आहेत. लोक त्यांना पेनेभाऊ ऊर्फ नाथालोपी नावाने संबोधतात. आमदार अतिशय भाबडे आहेत. चाळीस वर्षे त्यांनी एका विरोधी पक्षाचे काम केले. त्यानंतर पक्ष सत्तेवर आला तेव्हा आमदारांना वाटले की आपण मुख्यमंत्री होऊ. पण भलताच माणूस मुख्यमंत्री झाला. आमदारांनी खूप आदळआपट केली. पण व्यर्थ.
पेनेलोपीप्रमाणेच आमदारांनी नाराजीचा गालीचा विणायला घेतला आहे. त्यांच्याभोवती विविध पक्षांचे नेते अधूनमधून जमा होत असतात. आपापल्या पक्षात बोलावत असतात. त्यांना वाटते की नाराजीचा गालीचा विणून झाल्यावर आमदार आपल्या पक्षात येतील. पण रात्रीच्या अंधारात आमदारांचा गालीचा कोण उसवतो हे समजत नाही.
आटपाटचे नागरिक कोरोनाबरोबर जगायला शिकले आहेत. नाराज आमदार पेनेभाऊ ऊर्फ नाथालोपी यांच्या गालिचाचे विणकाम आणि इतर पक्षातले नेते यांच्या बातम्या टीव्हीवर झळकू लागल्या आहेत. त्याअर्थी आटपाटची परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. लोक कोरोनाबरोबर जगायला शिकले आहेत.








