ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीसमोर आंदोलन
प्रतिनिधी / संगमेश्वर
संगमेश्वर जवळच्या नायरी शृंगारपूर कातुर्डी रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून काम सुरू होते परंतु हे काम गेले अनेक दिवस ठप्प आहे हे काम सुरू व्हावे यासाठी ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले असून ग्रामपंचायती समोरच हे आंदोलन सुरू केले आहे.
नायरी ते शृंगारपुर कातुर्डी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन सन २०१८/१९ मध्ये मंजुर झाला होता. या जवळपास सहा किमी लांबीच्या रस्त्याच्या कामाची निविदा निघाली होती. सदर काम फेब्रुवारी २०२० मध्ये पुर्ण करण्याची अंतिम मुदत असताना प्रत्यक्ष कामाला सुरुवातच फेब्रुवारी २०२० मध्ये करण्यात आली. रस्ता खोदुन ठेवण्यात आला. काही ठिकाणी मोर्यांची अर्धवट कामे करण्यात आली. यानंतर लॉकडाऊन सुरु झाल्याने सर्व कामे ठप्प झाली.
त्याआधी हे काम निकृष्ट सुरु असल्याची ओरड येथील ग्रामस्थानी केली होती हे काम जिल्हास्तरीय नेत्याने घेतल्याने वरिष्ठ अधिकार्यानी लक्ष दिले नाही. रस्ता खोदुन ठेवल्याने पावसाळ्याभर कातुर्डी एसटी बंद होती. आता सारे सुरळीत झाले असताना अद्याप रस्त्याचे काम सुरु न झाल्याने येथील ग्रामस्थांनी आजपासुन बेमुदत उपोषण पुकारले आहे. हे ऊपोषण करणार असल्याचे पत्र संबंधित विभागाना देण्यात आले होते मात्र, प्रशासनाने दखल न घेतल्याने आम्हास हे उपोषण करण्यास भाग पडले असे शंगारपुर ग्रामस्थांनी सांगितले आहे.









