सांगली प्रतिनिधी
आष्टा अपर तहसिलदार कार्यालय येथील नायब तहसिलदार बाजीराव राजाराम पाटील वय ५२ वर्ष, रा. अशोकराज निवास, नवीन पोलीस ठाणे शिराळा शेजारी, शिराळा आणि महसूल सहाय्यक सुधीर दिपक तमायचे वय ३७ वर्ष, रा. शांतीनगर, इचलकरंजी ता. हातकणगले जि. कोल्हापूर यांना एक हजाराची लाच स्विकारलेबाबत कारवाई करण्यात आली. ही कारवाई सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
तक्रारदार यांनी त्यांच्या जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर राजपत्राप्रमाणे नावामध्ये बदल करून मिळणेबाबत अपर तहसिलदार कार्यालय आष्टा ता. वाळवा जि.सांगली या ठिकाणी अर्ज केला होता. तक्रारदार यांचे सातबारा उताऱ्यावर राजपत्राप्रमाणे नावामध्ये बदल करून देण्याच्या कामामध्ये प्रकरण सही करून तहसिलदार यांचेकडे पाठवण्यासाठी नायब तहसिलदार पाटील व लिपीक तमायचे यांनी तक्रारदार यांचेकडे एक हजार रूपये लाच मागणी केली होती. त्यानुसार पाटील व तमायचे यांचे विरुध्द अपर तहसिलदार कार्यालय आष्टा या ठिकाणी सापळा लावला असता त्यांनी एक हजार रूपये लाच रक्कम स्विकारलेनंतर त्यांना पकडण्यात आले आहे.