ऑनलाईन टीम / नियामी :
आफ्रिका खंडातील नायजर देशाच्या पश्चिम भागातील टाहोआतील इंटाजेने, बॅकोरेट आणि अन्य काही गावात रविवारी रक्ताचे पाट वाहिले. दुचाकीवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी अवघ्या 3 तासात या गावांमधील 137 जणांची हत्या केली. सरकारी प्रवक्ते अब्दुलरहमान झकारिया यांनी सोमवारी सायंकाळी या वृत्ताला दुजोरा दिला.
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वीच नायजरचे नवे अध्यक्ष मोहम्मद बाझूम यांची निवड झाली. या निवडीनंतर मालीच्या सीमेजवळ असणाऱ्या नायजरच्या या गावांमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. याच भागात मागील काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी 66 जणांची हत्या केली होती. दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही.









