12 वर्षीय थोरल्या भावानेच केला खून- चार तासात पोलिसांनी लावला
प्रतिनिधी/ सातारा
खंडाळा तालुक्यातील नायगावात झालेल्या आठ वर्षीय चिमुरडय़ाचा खुनाचा उलगडा करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. प्रशांत जमादार या मुलाचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी समोर आल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथक व शिरवळ पोलिसांनी अवघ्या चार तासात छडा लावून संशयिताला ताब्यात घेतले. यातील धक्कादायक बाब म्हणजे 8 वर्षीय मृत मुलाच्या 12 वर्षीय भावानेच हा खून केल्याचे तपासात समोर आले.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. नायगाव ता.खंडाळा येथील एका माळावर शेती कामास कर्नाटक येथील कुटुंबीय वास्तव्यास आहे. आई, वडील दिवसभर कामावर जातात. त्यांना दोन मुले असून ती दिवसभर घरी व परिसरात खेळत असतात. सोमवारी दोन्ही मुले त्याच परिसरात खेळत होती. त्यानंतर त्यातील थोरला मुलगा त्याच्या भावाला तिथेच सोडून घरी आला.
सोमवारी सायंकाळी मुलांचे वडील कामावरून आल्यानंतर दुसरा मुलगा दिसत नसल्याने त्यांनी त्याबाबत थोरल्या मुलाला धाकटय़ा मुलाबाबत विचारणा केली. यावर त्याने ‘प्रशांत कुठे आहे हे मला माहित नसल्याचे सांगितले.’ बराच वेळे गेल्यानंतरही लहान मुलगा घरी येत नसल्याने कुटुंबियांना त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना लहान मुलगा घराशेजारील पपईच्या बागेमध्ये रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला दिसला. यावेळी त्याच्या गळ्यावर व डोक्यावर वार झाल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती गावात समजल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. घटनेची माहिती फलटण पोलिसांना व एलसीबी पथकाला समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना वार केलेली कुऱहाड आढळून आली. यानंतर मृतदेह शिरवळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. यावेळी त्या मुलाच्या आई-वडीलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पण त्यांना माहिती नव्हते की खून करणारा त्यांच्याच पोटचा गोळा होता.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलिस अधीक्षक धिरज पाटील, डीवायएसपी तानाजी बरडे, पोनि किशोर धुमाळ, उमेश हजारे, सपोनि रमेश गर्जे, फौजदार सागर आरगडे, वृषाली देसाई, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, पोलिस हवालदार शरद बेबले, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, रवि वाघमारे, विशाल पवार, पंकज बेसके तसेच शिरवळ पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.
आईवडिलांचे प्रेम बारक्यावर असल्याने त्याला मारला
दरम्यान, या चिमुरडय़ाचा खून कोणत्या कारणातून केला? मारेकरी कोण? असे अनेक सवाल उपस्थित झाले. पोलिसांनी तत्काळ परिसरातून माहिती घेत आई, वडीलांकडे देखील प्राथमिक चौकशी केली. त्यातून महत्वपूर्ण क्लू मिळाल्यानंतर पोलिसांनी मृताच्या थोरल्या भावाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला. ‘आई, वडील बारक्यावरच अधिक प्रेम करतात. बारका माझ्यावरच घरी लक्ष ठेवून असतो,’ या क्षुल्लक कारणावरुन रागाच्या भरात कृत्य केल्याची कबुली दिली आहे.








