पाच जवान जखमी : शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू : भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानलाही मोठा दगा-फटका
श्रीनगर / वृत्तसंस्था
चीनशी सुरू असलेल्या संघर्षामुळे पूर्व लडाख सीमेवर तणावाची स्थिती असतानाच पाकिस्तानचे ‘नापाक इरादे’ पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. जम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमधील एलओसीजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यावेळी झालेल्या गोळीबारात भारताच्या तीन जवानांना वीरमरण आले असून पाच जवान जखमीही झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर सदर भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने सीमेपलीकडून गोळीबार केला. यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी मोर्टारही डागल्याची माहिती श्रीनगरस्थित संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. त्याचबरोबर भारतीय सैनिकांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानला मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागल्याची माहितीही त्यांनी दिली. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने जशास तसे प्रत्युत्तर दिल्यामुळे काही वेळातच पाकिस्तानी सैनिकांनी पोबारा केला. मात्र, यावेळी हल्ल्यात तीन जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. तसेच पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
पाक सैन्याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास गोळय़ांचा वर्षाव करत नियंत्रण रेषेवरील अनेक ठिकाणी भारतीय सैन्यतळांवरही हल्लाबोल केला. कुपवाडा येथील नियंत्रण रेषेलगत नौगाम सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला असून बुधवारी रात्री पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये नियंत्रण रेषेला लागून असलेल्या कृष्णा खोऱयातही गोळीबार केला. या गोळीबारात लान्स नायक कर्नल सिंह हे हुतात्मा झाले. ते पंजाबमधील संगूर जिल्हय़ातील रहिवासी होते. उत्तर काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये दोन सैनिक हुतात्मा झाले.
मोर्टार हल्ल्याला चोख प्रत्युत्तर
नौगाम आणि बुधवारी रात्री मेंढर उपविभागातील मानकोट सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार झाला. सैन्याच्या चौक्मया असलेल्या निवासी भागांना लक्ष्य करत 120 मिमी मोर्टारचा मारा केला. या हल्ल्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेला लागून असलेल्या ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.
बीएसएफच्या चौक्याही लक्ष्य
आंतरराष्ट्रीय सीमेवर (आयबी) शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सुमारे सात तास गोळीबार केल्यावर पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफच्या चौक्मयांना लक्ष्य केले. बुधवारी रात्री दहा वाजेपासून गुरुवारी पहाटे पाच वाजेपर्यंत पाकिस्तानच्या पप्पू तपासणी नाक्यावरून 25 रेंजर्सनी बीएसएफच्या युनिट्सवर निशाणा साधला. त्यास बीएसएफनेही चोख प्रत्युत्तर दिले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यापूर्वी कठुआ जिल्हय़ातील हिरानगर सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर संपूर्ण रात्रभर मध्यंतरी हल्ला करण्यात आला होता.









