पुढच्या आयुष्यात जलरंगातून चित्रे रेखाटायची आहेत
प्रतिनिधी/ बेळगाव
चित्रकार म्हणून करियर करता आलं नाही मात्र सुरुवात जे जे आर्टमधून याच क्षेत्राच्या शिक्षणातून झाली. कदाचित पुढच्या आयुष्यात जलरंगातून चित्रे रेखाटायला आवडेल. कारण जलरंगांची एक वेगळीच कमाल आहे. पाहणारा म्हणेल काय सुंदर फटका आहे पण तसं नसतं मुळी. ते अज्ञाताचं झिरपलेपण असतं आणि प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. जलरंगांना दुरुस्त करता येत नाही. ऑईल पेंट दुरुस्त करता येतात. म्हणूनच मला जलरंग रंगभूमीवरील नाटकासारखे वाटतात आणि ऑईल पेंट म्हणजे सिनेमा हे पटून जातं.
ज्ये÷ रंगकर्मी, अभिनेते, विचारवंत आणि आपल्या सामाजिक जाणिवेतून खऱया अर्थाने नायक ठरलेले नाना पाटेकर बोलत होते. येथील लोकमान्य रंगमंदिरात आयोजित ज्ये÷ चित्रकर्मी के. बी. कुलकर्णी जन्मशताब्दी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात नाना मनापासून बोलले. बेळगाव, प्रहार, के बीं च्या भेटी आणि आपल्यातला चित्रकार या साऱया विषयांवर भरभरून बोलतानाच माणूस म्हणून जगायला आणि वागायला कसं शिकलं पाहिजे याचा वस्तुपाठ नानांनी घालून दिला. नाना सगळय़ांना आवडतो आणि आपला का वाटतो याचे प्रत्यंतर त्यांच्या प्रत्येक वाक्मयगणिक पडणाऱया टाळय़ांनी जाणवून दिले.
उद्घाटन सोहळय़ाच्या अध्यक्षस्थानी बाबा धोंड होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून नाना पाटेकर होते. ज्ये÷ चित्रकार आणि के बी सरांचे पहिले शिष्य रवी परांजपे, चित्रकर्मी दत्ता पाडेकर, बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने उद्योजक दिलीप चिटणीस आणि के बी सरांच्या स्नुषा प्रभाताई कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. जन्मशताब्दी समितीचे निमंत्रक जगदीश कुंटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनिल चौधरी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिल्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. बाबा धोंड यांच्या हस्ते नाना पाटेकर यांचा तर नाना पाटेकर यांच्या हस्ते रवी परांजपे, विकास पाटणेकर, दत्ता पाडेकर, दिलीप चिटणीस व प्रभाताई कुलकर्णी यांचा सन्मान झाला. शतकाचे संचित या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले तसेच प्रारंभी के बी सरांचा जीवनपट उलगडणाऱया लघुपटाचे प्रदर्शनही झाले.
अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा दृष्टिकोन
दत्ता पाडेकर यांनी बोलताना दिवंगत जॉन फर्नांडिस यांच्या माध्यमातून के बी सरांच्या झालेल्या ओळखीबद्दल माहिती देऊन सरांकडे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा दृष्टिकोन होता तसेच त्यांच्यातील ममत्व या गुणांचा उल्लेख केला. त्यांच्या कार्यावर एक मोठा ग्रंथ होऊ शकेल असेही ते म्हणाले. रवी परांजपे यांनी आदर्श कलाशिक्षक कसा असावा याचे मूर्तिमंत रूप म्हणजे सर असे सांगून विद्यार्थ्यांमधील त्यांचे समरस होणे अत्यंत महत्त्वाचे होते असे सांगितले.
आभाळ कमी पडतं म्हणून मी शेतावर राहतो
यानंतर नाना पाटेकर यांनी बोलताना कलेच्या माध्यमातून व्यक्त होताना आतील घुसमट महत्त्वाची असे सांगून भूक, अपमान, अहवेलना, समाजात असलेली विसंगती, दांभिकपणा यावर चीड व्यक्त होताना कला घडत जाते असे सांगितले. नाक्मयावर उभं राहून आपण काही आरडाओरड केली की पोलीस पकडतील आणि मारतील पण तेच आपण कलेच्या माध्यमातून केलं तर त्याचा परिणाम चांगला होतो. क्रांतीची सुरुवात व्यासपीठावरूनच होते. आपण फक्त आपल्याभोवती भिंती बांधून ठेवतो त्यामुळे पलीकडचं दिसत नाही. मुंबईत राहिलो की आभाळ कमी पडतं म्हणून मी शेतावर राहतो. असे सांगितले.
साधेपणाचं जीवन नेहमीच चांगल
सर्व सुविधांचे आपण गुलाम व्हायला लागलो आहोत. सहज साधेपणाचं जीवन नेहमीच चांगलं. आपण के बी सरांची अनेक चित्रं पाहिली आहेत. त्यात त्यांचा साधेपणा मला भावला. त्यांच्यात आणि माझ्यात एक समानधर्मी धागा आहे तो म्हणजे मला कोणीही ओळखू नये हा. मी मर्यादित असलो पाहिजे. रंगभूमीवर मी राजा पण खाली उतरलो की प्रजा झालो पाहिजे, असे ते म्हणाले.
आजची राजकीय आणि सामाजिक स्थिती तुम्हाला शांत राहू देत नाही. मी जर कलेच्या माध्यमात आलो नसतो तर आत्महत्या केली असती. माझी घुसमट मी बाहेर काढतो पण बाकीचे मुके का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आमदार खासदारांना आपण निवडून देतो मग त्यांना आपण चांगलं वाईट सांगू शकत नाही का? आपण भोवतालच्या भिंती तोडून कबरीतून कधी बाहेर येणार आहोत? असे प्रश्न उपस्थित करतानाच दुर्दैव हे आहे की आपण आपल्या मनाला मारायला लागलोय. सहज गप्पा मारणं विसरून गेलोय. यातून बाहेर पडा असा सल्ला नानाने दिला.
आपल्या परिस्थितीने जे शिकवलं ते विसरायचं नाही. अपमान जे शिकवतो त्यासारखी गम्मत नाही. पुन्हा आपण आपला झाला तसा अपमान कुणाचाच कधी करायचा नाही. नाही म्हणता आलं पाहिजे. असे काही सल्ले देतानाच मी येथे स्वतःशीच बोलतोय हे त्यांनी सांगितले. बाबा धोंड यांच्या अध्यक्षीय समारोपा नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
के.बी.ंच्या चित्रांचे प्रदर्शन
के. बी. कुलकर्णी यांनी चित्रकलेच्या प्रांतात बेळगावचे नाव उंचावले. त्यांच्या जन्मशताब्दीचा सोहळा मंगळवारपासून सुरू झाला. यानिमित्त वरेरकरनाटय़ संघाच्या तळमजल्यावर के.बी.ंच्या चित्रांचे प्रदर्शनही मांडण्यात आले आहे. ज्ये÷ चित्रकार रवी परांजपे यांनी फित कापून जन्मशताब्दी सोहळय़ाचे उद्घाटन केले. तर अभिनेते आणि चित्रकार नाना पाटेकर यांनी के. बीं. च्या पुतळय़ाचे अनावरण केले. एसकेई सोसायटीचे पदाधिकारी दिलीप चिटणीस यांनी रोपाला पाणी घालून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रदर्शनात के.बी.कुलकर्णी यांच्या एकाहून एक सरस आणि कलात्मक चित्रांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे जे. एन. भंडारी स्कूल ऑफ आर्टस्च्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांचाही समावेश आहे. नाना पाटेकर, रवी परांजपे यांच्यासह के.बीं.चे अनेक शिष्य याप्रसंगी उपस्थित होते. प्रदर्शनातील चित्रे पाहताना के. बी. कुलकर्णी यांची चित्रशैली किती बोलकी आहे याचे प्रत्यंतर सर्वांनाच आले. जगदीश कुंटे यांनी स्वागत केले. तर ऋषाली मराठे यांनी सूत्रसंचालन केले.









