टिळकवाडी परिसरात वाहन बंद पडल्याने समस्या : वाहनांच्या दुरुस्तीची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
महानगरपालिकेची कचरावाहू वाहने रस्त्यावर कधी बंद पडतील याचा नेम नाही. याचा प्रत्यय सोमवारी सकाळी टिळकवाडी भागात अनुभवास आला. सकाळपासून स्वच्छता कामगार आपले दैनंदिन काम सुरू करतात. पण ऐनवेळी वाहने बंद झाल्याने कचरा वाहतूक ठप्प होते. कोटीचा निधी खर्च करणाऱया महापालिकेने सुस्थितीतील वाहने उपलब्ध करावीत, अशी मागणी होत आहे.
मनपाचे स्वच्छता कामगार दररोज ठिकठिकाणाची स्वच्छता करतात. तसेच गोळा झालेला कचरा वाहनांमधून नेला जातो. पण सोमवारी अचानक वाहन नादुरुस्त झाल्याने कर्मचाऱयांना याचा त्रास सहन करावा लागला. परिणामी वाहन रस्त्याच्या मधोमध नादुरुस्त अवस्थेत थांबल्याने तेथून ये-जा करणाऱया वाहनांनादेखील अडथळा निर्माण झाला. परिणामी वाहने अन्य मार्गाने वळविण्यात आली.
शहरात कचरा जमा करणारी बहुतांश वाहने नादुरुस्त असल्याने प्रत्येक ठिकाणी अशी वाहने बंद अवस्थेत असतात. स्वच्छता आणि वाहतुकीकरिता प्रतिवर्षाला 25 कोटीहून अधिक निधी खर्च करण्यात येतो. पण वाहने व्यवस्थित नसल्याने याचा त्रास वाहनधारकांसह स्वच्छता कामगारांनादेखील सहन करावा लागत आहे.
नागरिकांना नाहक त्रास
कचरावाहू वाहनांच्या मागील बाजूस दरवाजा व्यवस्थित नसल्याने बहुतांश वाहनांतील कचरा रस्त्यावर पडतो. तुरमुरी कचरा डेपोला कचरा घेऊन जाताना बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर कचरा पडतो. तसेच काहीवेळा कचरा वाहतूक करणाऱया वाहनावर ताडपत्री घातली जात नसल्याने वाहनातील कचरा वाऱयाने उडून मागून येणाऱया दुचाकी व अन्य वाहनधारकांवर पडतो. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधित अधिकाऱयांनी वाहनांची देखभाल करण्याकडे विशेष लक्ष दिल्यास गैरसोय टाळता येईल. महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष द्यावे, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून, तसेच स्वच्छता कर्मचारीवर्गाकडून ऐकावयास मिळत होत्या.









