रस्त्यांवर करणीबाधेचे साहित्य टाकल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रतिनिधी /बेळगाव
एकीकडे विज्ञानामुळे प्रगती केली जात असताना दुसरीकडे अजूनही करणीबाधेचे प्रकार घडत आहेत. अनगोळ येथे मागील काही दिवसांपासून करणीबाधा केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रहदारीच्या रस्त्यांवर करणीबाधा केलेले साहित्य टाकण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
नाथ पै नगर येथील तलावाशेजारी रस्त्यावर करणीबाधा केलेले साहित्य टाकले जात आहे. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी शेकडो नागरिक जातात. त्यांना याचा त्रास होत आहे. याचसोबत या मार्गावरून शेतकरी ये-जा करीत असतात. त्यांना या प्रकाराचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अमावास्या, पौर्णिमेदिवशी अशा प्रकारांमध्ये वाढ होत असून हे प्रकार थांबविणे गरजेचे आहे. एकीकडे सुशिक्षितांची संख्या वाढत असताना असे करणीबाधेचे प्रकारही वाढले असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
जनावरांना धोका वाढला
शेतवडीकडे जाणाऱया मार्गावर करणीबाधेचे साहित्य टाकले जात आहे. त्यामध्ये गुलाल, बांगडय़ा, नारळ, बाहुल्या, कोहळा, टाचण्या, लिंबू असे साहित्य टाकले जाते. हे साहित्य खाण्यासाठी जाणाऱया जनावरांच्या पोटामध्ये टाचण्यांसारखी अपायकारक वस्तू जात आहे. त्यामुळे जनावरांना धोका वाढला असून हे प्रकार बंद करण्याची मागणी शेतकऱयांमधून होत आहे. आजच्या वैज्ञानिक युगातही असे प्रकार घडत असल्याने या प्रकारांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.









