मुख्य मार्गच बंद असल्याने लहान मार्गांनी ये-जा : मोठय़ा वाहनचालकांना त्रास
प्रतिनिधी / बेळगाव
शहापूरच्या नाथ पै चौक येथे पेव्हर्स बसविण्याचे काम 5 ते 6 दिवसांपासून सुरू आहे. परंतु या कामाचा फटका स्थानिक तसेच इतर नागरिकांना बसत आहे. सर्वच रस्ते बंद करण्यात आल्याने रुग्ण व शववाहिका पुन्हा माघारी फिरत आहेत. त्यामुळे एका बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱया बाजूच्या कामाला सुरुवात करावी व रस्ते खुले ठेवावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील महत्त्वाच्या चौकांचे सुशोभिकरण केले जात आहे. वडगाव-शहापूर, शहापूर-गोवावेस या दोन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता नाथ पै चौक येथील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सर्कलमध्ये पेव्हर्स बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मागील 5 ते 6 दिवसांपासून पेव्हर्स बसविले जात आहेत. परंतु या कामासाठी वडगाव, खासबाग, शहापूर, गोवावेस व स्मशानभूमीकडे जाणारे मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. रस्ता बंद केल्याने नागरिकांना फटका सहन करावा लागत आहे.
शववाहिका फिरल्या माघारी
नाथ पै चौक येथूनच शहापूर स्मशानभूमीकडे रस्ता जातो. नाथ पै चौक येथे रस्ता बंद करण्यात आल्याने स्मशानभूमीकडे जाणाऱया शववाहिकांना फटका बसत आहे. अनेकांना रस्ता बंद असल्याची माहिती नसल्याने शववाहिका माघारी फिरत असून, इतर मार्गांनी स्मशानभूमीकडे न्याव्या लागत आहेत. मागील चार दिवसात अनेक शववाहिका माघारी फिरल्याची माहिती स्थानिकांनी दिली. याचसोबत स्थानिक रहिवाशांनाही या समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे.
शहापूरमधील मुख्य मार्गच बंद असल्याने इतर लहान मार्गांनी वाहनचालक ये-जा करत आहेत. दुचाकी व रिक्षा ही वाहने लहान मार्गाने ये-जा करीत असली तरी मोठय़ा वाहनांची पंचाईत होत आहे. रुग्णवाहिकाही कोठून घेऊन जायची असा प्रश्न चालकांसमोर उभा ठाकत आहे. त्यामुळे पेव्हर्स बसविण्याचे काम वेळेत पूर्ण करून मार्ग खुला करण्याची मागणी केली जात आहे.









