आनंदवाडीच्या कलाकारांनी बनविली ‘शॉर्टफिल्म’ ‘कोरोना’ संकटात जनजागृतीपर दिला संदेश : ‘यु-टय़ूब’वर रिलीज
राजेंद्र मुंबरकर / देवगड:
संपूर्ण जगावर गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. या संकटात दुसऱयाचा जीव वाचविणारे ‘कोरोना योद्धा’ही समोर आले. तर दुसरीकडे कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जागा मिळणेही मुश्किल बनले. नातेसंबंध व माणुसकीची खरी ओळख ‘कोरोना’सारख्या ‘व्हायरस’ने समाजाला दाखवून दिली. एखाद्या जीवघेण्या ‘व्हायरस’पेक्षा समाजात माणुसकी जिवंत राहावी. नातेसंबंधातील एकोपा आणि प्रेम अधिक बळकट राहावे, असा जनजागृतीपर संदेश देणारी ‘क्वारंटाईन’ ही शॉर्टफिल्म देवगड- आनंदवाडी येथील नवोदित कलाकारांनी ‘यु-टय़ूब’वर ‘रिलीज’ केली आहे.
कोरोनाच्या महामारीत ‘क्वारंटाईन’ या शब्दाने समाजात आपली वेगळी ‘जागा’ निर्माण केली. कोरोनाबाधिताकडून संसर्ग होऊ नये, यासाठी कोरोनाबाधित ‘क्वारंटाईन’ असावा, असा सर्वसाधारण निकष या महामारीत लावला गेला. क्वारंटाईनमध्येच कोरोनाबाधितावर उपचार होऊ लागले. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीची दहशत समाज मनावर एवढी प्रचंड प्रमाणात रोवली गेली की आपला सख्खा नातेवाईक जरी परगावाहून आपल्या घरी येणारा असेल, तर त्याला इतरत्र ‘क्वारंटाईन’ होण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. ग्रामीण भागात तर ‘क्वारंटाईन’ला अधिक महत्व दिले गेले. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून जनजागृतीचे धडे गिरवले गेले. तरीही कोरोनाची बाधा झाल्यास आपले कुटुंब धोक्यात येईल, या भीतीने परगावाहून आलेला आपला नातेवाईक काही काळासाठी का होईना ‘परका’ बनला. या वास्तवतेकडे प्रकाशझोत टाकणारी ‘क्वारंटाईन’ ही शॉर्टफिल्म हृदयस्पर्शी संदेश देणारी ठरली आहे.
शॉर्टफिल्मध्ये चाकरमानी मुलाची व्यथा
या शार्टफिल्ममध्ये कोरोनाच्या संकटात मुंबईहून गावी परतणाऱया मुलाची व्यथा मांडण्यात आली आहे. मुंबईहून गावी परतण्याऱया मुलाची खबर मिळाल्यानंतर बाप गर्भगळीत होतो. तो मुलगा कोरोनाबाधित नसतानाही गावातील लोक तो ‘पॉझिटिव्ह’ असल्याचा संशय व्यक्त करतात. अखेर, घराच्या उंबरठय़ावर आलेल्या मुलाला त्याचा बाप त्याला अक्षरशः घराबाहेर ढकलून दरवाजा बंद करतो. अन् तो मुलगा आल्या पावली माघारी फिरतो. कोरोनाने ‘नाते’ही संपविले, याचे वास्तवदर्शी चित्रीकरण आनंदवाडीच्या युवकांनी शॉर्टफिल्ममध्ये चित्रीत केले आहे.
स्थानिक कलाकारांचा सहभाग
शॉर्टफिल्मचे चित्रीकरण आनंदवाडी व देवगड शहरात झाले. लेखन व दिग्दर्शन मीतेश कोयंडे यांनी केले आहे. यात नरेन तारी, धनंजय मुणगेकर, मीतेश कोयंडे, वैभव मालवणकर, अक्षय वेंगुर्लेकर, लक्ष्मी मुणगेकर, हार्दिक कुबल, साहील कुबल, विभावरी कुबल, शिवराज कोयंडे, कृष्णा मुळेकर, आशिष कुबल या कलाकारांचा सहभाग आहे. सिनेमोटोग्राफी अभिजीत मुणगेकर व समीर होडेकर यांनी केली आहे. व्हीडिओ एडिटिंग राजेंद्र कांबळे यांनी केले. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, महेश मुणगेकर, वैभव मालवणकर, सोहम मुणगेकर व संकेत कॉम्प्युटर- देवगड यांनी विशेष सहकार्य केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही शॉर्टफिल्म जनजागृतीसाठी मोलाची ठरणार आहे.









