8 गावातून केवळ 63 तक्रारी : साखर गावातून सर्वाधिक 35 अर्ज,6 गावांमधून एकही तक्रार अर्ज नाही
वार्ताहर / राजापूर
तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प परिसरातील गावांमध्ये झालेल्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहार चौकशीसाठी प्रांत कार्यालयासह संबंधित तलाठी सजांमध्ये स्थापन केलेल्या तक्रार स्वीकृती कक्षात 63 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये साखर गावातून सर्वाधिक 35 तक्रारी दाखल झाल्या आहेत. कारर्शिंगेवाडी, दत्तवाडी, पाळेकरवाडी, सागवे, कारिवणे व पडवे गावातून एकही तक्रार दाखल नाही.
राजापूर तालुक्यातील नाणार आणि लगतच्या चौदा गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित झाल्यानंतर या परिसरात मोठय़ा प्रमाणात जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार झाले होते. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकल्पातील जमिनीच्या गैरव्यवहाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अशा तक्रारींच्या संकलनासाठी राजापूर प्रांत कार्यालय तसेच संबंधित गावातील तलाठी कार्यालयात तक्रार स्वीकृती कक्ष स्थापन करण्यात आले होते. 31 मार्च ही तक्रारी दाखल करण्याची शेवटची तारीख होती.
आठ गावांतून तक्रारी
या काळात 63 तक्रारी दाखल झाल्या आहेत. विल्ये 6, चौके 2, उपळे व तारळ प्रत्येकी 7, कात्रादेवी 3 नाणार 1, गोठीवरे 2, साखर 35 अशा 63 तक्रारींचा यात समावेश आहे. उपळेतील शशिकांत मिशाळ यांनी चेक बाऊन्स झाल्याची भगवान कोंडसकर, धनाजी कोंडसकर यांनी सामाईक जमिनीची विक्री झाल्याची प्रसाद मोंडकर, सुनील घाडी यांनी कुळाच्या परवानगीशिवाय जमीन विक्री झाल्याची, कात्रादेवी येथील गंधाली आंबेरकर यांनी फसवून खरेदीखत केल्याची, सदाशिव गुरव यांनी संमती न घेता विक्री केल्याची, संजय गुरव यांनी मुखत्यार पत्राचा फायदा घेऊन संमती न घेता व्यवहार केल्याची, गोठीवरे येथील चंद्रकांत झोरे यांनी सातबारावर हस्तदोषाने नाव कमी झाल्याची तर कविता नार्वेकर यांनी बनावट कागदपत्रे बनवून विक्री केल्याची तक्रार केली आहे.
काहींची चौकशीची मागणी
चौके येथील विलास हसोळकर, रामचंद्र भडेकर तसेच तारळ येथील दीपक कोंडसकर यांनी सामाईक जमिनीची विक्री केल्याबाबत, तारळ येथील दिपिका कोंडसकर, सुनिता चव्हाण, रूक्मिणी खांडेकर यांनी सातबारामधून नाव कमी केल्याची, विठ्ठल खांडेकर यांनी फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तर अनंत मुळम, विष्णू कुवरे, रघुनाथ मोंडे, विल्ये येथील कृष्णकांत ताडवे, त्रिंबक तावडे, प्रकाश तावडे, रत्नोजी तावडे, संतोष तावडे, नम्रता पळसमकर यांनी झालेल्या खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जमिनी परत देण्याचीही मागणी
तसेच साखर येथील अनंत भातडे, बाळकृष्ण देवळेकर, तारामती राडये, वासुदेव कांबळी, सुनिता कातकर, अशोक लाखण, काशिनाथ बावकर, दत्ताराम तेरवणकर, शांताराम देवळेकर, भिकाजी बावकर, केरू बंडबे, पुनाजी मिरगुले, बाळकृष्ण कांबळी, सारिका कांबळी, रोहिदास कांबळी, एकनाथ कातकर, वासुदेव देवळेकर, रामचंद्र देवळेकर, राजन देवळेकर, हरिश्चंद्र देवळेकर, राजन देवळेकर, हरिश्चंद्र देवळेकर, वासंती देवळे, संतोष देवळेकर, रामचंद्र कांबळी, गंगाबाई कांबळी, बाळकृष्ण भातडे, सुरेश भातडे, कमलाकर भातडे, सीताराम लाखण, बाळकृष्ण धुमाळ, राजाराम तेरवणकर, विष्णू राडये, गोकुळ राडये, केरू मांडवकर, विठ्ठल बंडबे, पर्शुराम देवळेकर यांनी विक्री झालेल्या जमिनी परत मिळण्याची मागणी केली आहे.









