कोकरूड / वार्ताहर
शिराळा तालुक्यातील नाठवडे येथील दादासो तुकाराम शेवाळे यांच्या जनावरांच्या शेडला शॉर्टसर्किटने दि.11 रोजी आग लागून दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. नाठवडे येथील शेडगेवाडी मुख्य रस्त्यानजीक असणाऱ्या दादासो शेवाळे यांच्या जनावरांच्या शेडला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत जनावरांचे शेड, पिंजर, कडबा, गवत, शेती औजारे, संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले.
प्रसंगावधान राखून शेडमधील जनावरांना वेळेत बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. सरपंच बाजीराव मोहिते यांनी गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतील पाणी सोडून,तानाजी मोहिते यांचे जनरेटरद्वारे मोटर लावून प्रेशरच्या पाण्याद्वारे आग विजवली. यावेळी सुहास मोहिते, वसंत मोहिते,राकेश वनारे,बाबासो मोहिते,सर्जेराव मोहिते,प्रशांत वनारे आदी युवकांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तलाठी तुषार गुरव हे निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने सोमवार दि.13 रोजी नुकसानग्रस्त शेडचा पंचनामा करणार आहेत.शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार व प्रथमदर्शनी अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.








