अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : काही राज्यांमध्ये मतमोजणी सुरूच : बायडन-ट्रम्प यांच्यात जोरदार चुरस
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील अंतिम निकालाची उत्कंठा अजूनही संपलेली नाही. विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि प्रतिस्पर्धी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे आपापल्या विजयाचे दावे करत आहेत. बायडन यांच्या तुलनेत ट्रम्प पिछाडीवर असले तरी देशात अजूनही नाटय़मय घडामोडी घडत असल्यामुळे अंतिम निकालाची प्रतीक्षा कायम आहे. अजूनही मतमोजणी सुरू असल्याने विजयी उमेदवाराची घोषणा पुढील आठवडय़ातही होऊ शकते. नेवाडा आणि अलास्का या राज्यांसाठी मंगळवार, 10 नोव्हेंबर तर, नॉर्थ कॅरोलिनासाठी गुरुवार, 12 नोव्हेंबर ही पोस्टल मतांसाठी अखेरची तारीख देण्यात आली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळय़ात पडेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. सध्या जो बायडन हे आघाडीवर आहेत. पण त्यांना विजयासाठी आवश्यक मते (270) अद्याप मिळालेली नाहीत. अमेरिकेत इलेक्टोरल कॉलेज पद्धतीने मतमोजणी केली जात असल्याने बायडन यांना बहुमत सिद्ध करणे आवश्यक आहे.
कोरोना व्हायरसच्या साथीमुळे अनेक मतदारांनी पोस्टल मतदान करण्यास पसंती दिली होती. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पोस्टल मतदान या निवडणुकीत झालेले आहे. मतमोजणीसंबंधी अमेरिकेतील वेगवेगळय़ा राज्यांमध्ये वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला थोडा विलंब होण्याची शक्मयता आहे. अरिझोना राज्यात जो बायडन यांना किंचित आघाडी मिळाली आहे. या राज्यात 5 लाख मतांची मोजणी अद्याप बाकी आहे. यापैकी निम्म्याहून अधिक मते मेरिकोपा काऊंटी या परिसरातील आहेत. नेवाडामध्येही बायडन यांना निसटती आघाडी मिळाली आहे. मतमोजणी वेगाने करण्यात येत असल्याचे येथील राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्यासाठी वेळमर्यादाही देण्यात आली आहे. इथली पोस्टल मते अद्याप मोजण्यात आलेली नाहीत.
जॉर्जिया राज्यात बायडन यांच्यापेक्षा ट्रम्प किंचित पुढे आहेत. इथल्या 90 हजार मतांची मोजणी अद्याप बाकी आहे. पेन्सिल्व्हेनियामध्येही अद्याप 7 लाख 63 हजार 311 पोस्टल मते मोजण्याची प्रक्रिया सुरू आहे. या राज्यातील कायद्यानुसार मतदानाआधी पोस्टल मते मोजली जाऊ शकत नाहीत. सध्या ट्रम्प आघाडीवर असले तरी पोस्टल मतांच्या मोजणीत बायडन आघाडी घेऊ शकतात.
काही ठिकाणी पुनर्मोजणीची मागणी
मिशिगनमधील मतमोजणीत पारदर्शकता नसल्याचं सांगत ते स्थगित करण्याची मागणी झाली आहे. तसेच पेन्सिल्व्हेनियातील निकालाला आव्हान देण्यात आल्याने पोस्टल मतदानासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. बायडन यांनी जॉर्जियात विजय मिळवला असून नेवाडा, अरायझोना आणि नॉर्थ कॅरोलायनामधील एखादे राज्य जिंकले तरी त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे ट्रम्प यांना पेन्सिल्वेनियासोबतच जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलायना, नेव्हाडा आणि अरायझोनापैकी किमान तीन ठिकाणी विजय मिळवणे आवश्यक आहे.
ट्रम्प यांची भाषणबाजी टीव्ही चॅनेल्सनी रोखली
मतमोजणी सुरू असतानाच ट्रम्प यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत समर्थकांसमोर भाषणबाजी केली. यासंबंधीचे थेट प्रसारण प्रसारमाध्यमांकडून केले जात होते. मात्र, या भाषणाचे प्रसारण आघाडीच्या टीव्ही चॅनेल्सनी अर्ध्यावरच बंद केले. मतदानामध्ये घोटाळा झाला असून वैध मतेच मोजली तर आपणच जिंकलो असल्याचा दावा त्यांनी यावेळीही बोलताना केला. पण त्यासाठीचा कोणताही पुरावा त्यांनी दिला नाही.









