प्रतिनिधी/ चिपळूण
एकीकडे शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राला उद्घाटनाची प्रतीक्षा असतानाच आता पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत नूतनीकरण व बांधकामाचा आढावा घेतला जाणार आहे.
या बैठकीला नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासह नगरसेवक व मुख्याधिकाऱयांना निमंत्रित करण्यात आले आहे. येथे 2005 साली आलेल्या महापुराचा फटका बसल्यापासून सांस्कृतिक केंद्र गेली 15 वर्षे बंद आहे. त्यामुळे नागरिक मनोरंजनापासून दूर राहिले आहेत. मात्र यासाठी सुमारे 8 कोटी रूपये खर्च करून नगर परिषद गेल्या काही वर्षापासून त्याची दुरूस्ती करीत आहे. आता या केंद्राचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून त्याचे कधीही उद्घाटन होऊ शकते. असे असतानाच काही दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत उद्घाटन कार्यक्रमाची रूपरेषा व खर्च मंजुरीचा विषय ठेवण्यात आला होता. मात्र त्यावर विचार न करता या कामाची वास्तूविशारदांकडून तांत्रिक तपासणी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. मुळातच काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली येथे सातत्याने पाहणी केली जात आहे. तसेच नगर अभियंता पाणी व विद्युत विभागाचे अभियंता यांच्याकडून स्पेशल तपासणी झाली असून शासनाचे थर्डपार्टी ऑडीटही झाले आहे. असे असताना तांत्रिक तपासणीची मागणी नेमकी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
असे असतानाच ही तपासणी करण्यासाठी पॅनलवरील वास्तूविशारद यांची नियुक्ती व शुल्कास मंजुरी देण्याचा विषय गुरूवारच्या स्थायी समिती सभेत आला असता महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी त्यास विरोध करून हा विषय सर्वसाधारण सभेत घेण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे ही तपासणीही रखडली आहे. त्यात आता मुंबईतील बैठकीची भर पडली आहे. या बैठकीत नूतनीकरण व बांधकामाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यांनतर आढावा का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
या बैठकीला खेराडे यांच्यासह शिवसेनेचे गटनेते उमेश सकपाळ, राष्ट्रवादीच्या गटनेत्या वर्षा जागुष्टे, काँग्रेसचे गटनेते सुधीर शिंदे, नगरसेवक मोहन मिरगल, शशिकांत मोदी, मुख्याधिकारी डॉ. विधाते यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे याच सभेत उद्घाटनाचा मुहूर्त ठरतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









