राज्य सरकारचा निर्णय : कलाकरांसह तंत्रज्ञांची गैरसोय होणार दूर
अहिल्या परकाळे / कोल्हापूर
नाटकाच्या दौऱ्यानिमित्ताने कलाकारांची विविध ठिकाणी धावपळ सुरू असते. एका ठिकाणचा प्रयोग संपला की दुसऱ्या गावातील नाट्यप्रयोगला जाण्यासाठी कलाकारांचा प्रयत्न असतो. मात्र बऱ्याचदा वेळेअभावी नाट्यप्रयोगाच्या ठिकाणी पोहचता न आल्याने अनेक वेळेला कलाकारांना विश्रांतीगृह मिळत नाही. अशावेळी कलाकारांच्या गैरसोयीची दखल घेत मराठी नाट्यकर्मींसाठी शासकीय विश्रामगृहातील विश्रांती कक्षात आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर करून दिलासा दिला आहे. नाट्यप्रेमींमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
नाट्यप्रयोग जास्तीत जास्त रात्रीच्या वेळेत सादर होत असतात. त्यामुळे पहिले नाटक संपले की पुढच्या गावी जाण्यासाठी धाकधूक सुरू असते. त्यामुळे कलाकारांना आवश्यक झोप मिळत नसल्याने, वाहनात बसूनच झोप घ्यावी लागते. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. वाहनचालकांचीही अपुरी झोप न झाल्याने अपघात होवून काही कलाकार जखमी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. कलाकारांसाठी शासकीय विश्रामगृहात विश्रांती कक्ष असावा, तसेच विश्रांतीसह रंगीत तालम करण्यास त्यांना मदत होण्याच्या उद्देशाने शासनाने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. नाटकासाठी प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, केशभूषा, मेकअपमन याची सांगड घातलेली असते. त्यामुळे शासन निर्णयाचा फायदा कलाकारांबरोबरच सर्वच टीमला होणार आहे.
विश्रामगृहासाठी नियमावली
शासकीय विश्रामगृह परिसरातील नाटÎप्रयोगासाठी येणाऱया कलाकारांना विश्रामगृहातील आरक्षित कक्षात राहता येणार.
विश्रामगृहातील आरक्षण सात दिवसासाठी राहील.
कक्षाचा ताबा घेण्यापूर्वी डिपॉझिट भरावे लागणार आहे.
नाट्यकर्मींसाठी प्रतिकक्ष, प्रतिदिन 500 रूपये भाडे आकारण्यात येईल. वातानुकूलित कक्षासाठी खासगी व्यक्तीकडून आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या 50 टक्के भाडे आकारण्यात येईल.
स्थानिक नाट्यकर्मींना प्रतिसाद द्या
मुंबई, पुण्यातील नाटकांप्रमाणे कोल्हापुरातील स्थानिक हौशी किंवा व्यवसायिक नाटकांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. नाटकाची जाहिरात, दर्जेदार नाट्यसंहितेच्या आधारे प्रेक्षकांना खेचून आणण्याचा प्रयत्न नाट्यनिर्मात्यांनी केला पाहिजे. या निर्मितीला स्थानिक रसिकांनी प्रतिसाद देऊन उर्जितावस्था प्राप्त करून देण्याची गरज आहे.
शासनाचा निर्णय स्वागतार्ह
नाटकांच्या प्रयोगाला पूर्वीप्रमाणे नाट्यरसिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नाट्यनिर्मात्यासह कलाकारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शासनाने शासकीय विश्रामगृहात नाट्यकर्मींसाठी आरक्षित कक्ष ठेवून दिलासा दिला आहे.
प्रशांत जोशी, प्रतीज्ञा नाटÎरंग








