मिनी लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे दुष्कर झाले आहे. रात्री कर्फ्यू असतो. चुकून पाहुणा आला तर त्याला आम्ही साडेपाच वाजता निघायची सूचना करतो. सहा वाजेपर्यंत तो थांबला तर त्याला बारा तास ठेवून घ्यावे लागेल अशी भीती असते ना!
गेल्या वषीप्रमाणेच इस्त्री केलेले कपडे कपाटातून बाहेर पडायला उत्सुक आहेत. पण कोरोनाच्या भीतीने त्यांना बाहेर काढता येत नाही. रात्री टीव्हीवर लागणाऱया एका कुटुंबवत्सल मालिकेत ब्रह्मे आडनावाची सगळी पुरुष पात्रे घरभर आणि महिलांसमोर देखील बर्म्युडा-बनियनसारख्या चमत्कारिक पोषाखात वावरत असतात. लॉकडाऊनमुळे घरोघरी हा ब्रह्मे-पोषाख नाईलाजाने परिधान केला जातोय. ते जाऊ देत.
आमचा परममित्र नागजंपी ऊर्फ नाग्या बऱयाच दिवसांपासून प्रत्यक्ष भेटला नव्हता. परवा सकाळी चहाच्या वेळी त्याने तिरीमिरीत मला व्हीडिओ कॉल केला. त्यावेळी मी ब्रह्मे-पोषाखात असल्याने आधी दचकलो. पण नाग्याचा नंबर दिसला म्हणून फोन घेतला. नाग्या देखील ब्रह्मे पोषाखात होता. विचित्र दिसत होता.
“काय रे आपलं आयुष्य?’’
“काय झालं?’’
“हे सगळं पुढारी लोक इतकं हरामखोर… आपल्याला सांगतंय की तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून लांब उभं राहून बोला, हस्तांदोलन करू नका, सारखं हात धुवा… थकलं रे मी.’’
“तुला एवढय़ात कोणी मैत्रीण भेटली आणि सोशल डिस्टंसिंगमुळे लांबून बोलावं लागलं काय?’’ “नाय रे. पण हे सगळं ढोंगी पुढारी, फक्त आपल्याला अक्कल शिकवतंय, उपदेश करतंय आणि स्वतः निवडणुकीसाठी गर्दीच्या सभा घेतंय, रस्त्यावर उतरून आंदोलन करतंय, मास्क न लावता भाषण देतंय. त्यांना कोरोना कसं काय होत नसेल. टीव्हीवर यांना बघितलं की ते लोक आपल्याला चिडवतंय, खिजवतंय असं भावना होतंय.’’ “त्यांनाही लागण होत असेल रे, त्यांची बातमी ते लपवत असतील. किंवा त्यांना झाला नसेल तर होईल. कोरोना फार निःपक्षपाती आहे. तो धर्मांध नाही, तो जातीयवादी नाही, तो पेड मीडियाप्रमाणे पक्षपाती नाही. तो फक्त संधीची वाट बघत असतो. संधी मिळाली की त्या माणसाला पकडतो. तेव्हा गर्दी करणाऱया लोकांना, रस्त्यावर आंदोलने करणाऱया लोकांना, मास्क न लावणाऱया नेत्यांना देखील तो सोडणार नाहीच. कोरोना के घर में देर है. अंधेर नहीं. तो सगळय़ांना पकडणार आहे. तू स्वतःला जप. डॉक्टर लोकांनी सांगितलेले सगळे नियम पाळ.’’
नाग्याने मुंडी हलवली आणि फोन बंद केला.









