देशात टाळेबंदी लागू केल्यावर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. पण, राजस्थानातील एक जिल्हा मात्र संसर्ग रोखण्यास यशस्वी ठरला आहे. या जिल्हय़ाला लागून असलेल्या 7 जिल्हय़ांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून देखील हे यश मिळाले आहे. नागौर जिल्हय़ात अद्याप रुग्ण आढळून आलेला नाही. रुग्ण सापडलेल्या जिल्हय़ांनी घेरलेल्या नागौर जिल्हय़ात पूर्ण सतर्कता बाळगली जात आहे.
नागौरला बिकानेर, जोधपूर, सीकर, अजमेर, चुरू, जयपूर आणि पाली या जिल्हय़ांची सीमा लागून आहे. बिकानेरमध्ये 3, जोधपूरमध्ये 44 (27 इराणमधून आलेले), जयपूरमध्ये 55, अजमेरमध्ये 5, चुरूमध्ये 10, पाली आणि सीकरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. अशा स्थितीत कोरोना संसर्ग रोखण्यास नागौर प्रशासनाला यश आले आहे.
ध्वजसंचलनाद्वारे कठोर संदेश
संसर्ग रोखण्यास आतापर्यंत यशस्वी ठरलेल्या नागौर पोलीस-प्रशासनाची जबाबदारी अधिकच वाढली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने शनिवारी पूर्ण जिल्हय़ात ध्वजसंचलन करत कठोर संदेश दिला आहे. जनतेने पूर्ण सतर्कता बाळगल्याने प्रशासनाने आभार मानले आहेत.
घरातच थांबण्याचे आवाहन
टाळेबंदी पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी नागौर पोलिसांनी सर्व मोठी शहरे तसेच नागरी वस्तीत ध्वजसंचलन केले आहे. ध्वजसंचलनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हय़ातील 30 लाख जनता आता पोलिसांच्या भूमिकेत आहे. बाहेरून येणाऱया लोकांची माहिती पोलिसांना दिली जात असल्याचे उद्गार पोलीस अधीक्षक विकास पाठक यांनी काढले आहेत.









