पुलाची शिरोली /प्रतिनिधी
नागाव ता. हातकणंगले येथील डॉक्टरचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येताच नागावसह उपनगरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी नगर माळवाडी येथील एका डॉक्टरास आजाराची लक्षणे दिसून आल्यामुळे तीन दिवसापूर्वी स्वतःला विलगीकरण करून घशाचा स्वॅब तपासणीसाठी दिला होता. त्याचा बुधवारी पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे तात्काळ डॉक्टरांचे राहते घर तसेच त्यांचा दवाखाना व परिसर बंद केला आहे. तसेच आंबेडकर नगर येथील दवाखानाही तात्काळ बंद केला आहे.
सदर डॉक्टराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या अनेक लोकांनी स्वतःहून संजय घोडावत कॉलेज मध्ये स्वॅब तपासण्यासाठी दिले आहेत. डॉक्टरांच्या अहवालामुळे नागाव व उपनगरांमध्ये ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरपंच अरुण माळी यांनी संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेवून प्रशासनास यादी दिली जाणार आहे. तसेच गावात औषध फवारणी करणार असल्याचे सांगितले.








