बिग कॅट्सच्या परिवारात सिंह, बिबटय़ा, वाघ, जग्वार, चित्ता इत्यादींचा समावेश होतो. परंतु नागालँडच्या पर्वतीय क्षेत्रात अनोखा बिबटय़ा दिसून आला आहे. क्लाउडेड लेपर्डचे तेथे दर्शन झाले आहे. बिग कॅट्स फॅमिलीचा हा सदस्य अत्यंत दुर्लभ आहे. पहिल्यांदाच या चमत्कारिक बिबटय़ाला नागालँडच्या पर्वतीय क्षेत्रात पाहिले गेल्याचा दावा करण्यात येतोय.
संशोधकांच्या एका टीमने नागालँडमध्ये भारत-म्यानमार सीमेवरील एका जंगलात 3,700 मीटर उंचीवर लपलेल्या क्लाउडेड बिबटय़ांचे फोटोग्राफिक पुरावे जमविले आहेत. क्लाउडेड लेपर्ड (नियोफेलिस नेबुलोसा) झाडावर चढण्यात तरबेज असतो. हा एक मध्यम आकाराच्या मांजराइतका प्राणी असतो. परंतु बिग कॅट्समध्ये सर्वात छोटा मानला जातो.

कॅमेरा ट्रपद्वारे छायाचित्रे
दिल्लीमधील स्वयंसेवी संस्था वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया (डब्ल्यूपीएसआय)च्या नेतृत्वात संशोधकांनी पूर्व नागालँडच्या किफिर जिल्हय़ातील थानामीर गावाच्या सामुदायिक जंगलात 3,700 मीटरच्या उंचीवर 50 हून अधिक कॅमेरा ट्रपच्या मदतीने क्लाउडेड लेपर्ड्सची छायाचित्रे मिळविली आहेत. 65 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेल्या या जंगलात नागालँडमधील सर्वात उंच शिखर सरमतीचा अंतर्भाव होतो.
सदाहरित वनांमध्ये वास्तव्य
या दुर्लभ बिबटय़ाला आययूसीएन रेड लिस्ट ऑफ थ्रेटेड स्पीशीज अंतर्गत ‘असुरक्षित’ (सोपी शिकार) च्या स्वरुपात वर्गीकृत करण्यात आले आहे. तज्ञांनुसार क्लाउडेड लेपर्ड मोठय़ा प्रमाणावर कमी उंचीवरील सदाहरित वनांमध्ये आढळून येतात.









