ओटवणेत नाग संवर्धनाला धार्मिकतेची जोड
दीपक गावकर / ओटवणे
कोकण ही नागभूमी आहे. याच नागराजाला दैवत मानून त्याची पूजाही केली जाते. ओटवणे गावाला नागाचे वेगळेच ऐतिहासिक व धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. या गावाच्या इतिहासाची सुरुवात सातेरी रवळनाथ पंचायतनासह नाग व कासवाने झाले आहे. त्यामुळे या गावात नाग व कासवाच्या संवर्धनाला धार्मिकतेची जोड देण्यात आली असून ओटवणे हे नाग व कासव संवर्धनाचे गाव म्हणून परिचित आहे. या गावात नाग घरात राहिल्यास वैभवाचे लक्षण मानले जात असून याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.
ओटवणे शेरवाळेवाडीत ब्राह्मणस्थळ अर्थात नागमंदिर असून सुमारे चारशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. सावंतवाडी संस्थानच्या दृष्टीने या नागमंदिराला विशेष महत्व आहे. सन 1580 च्या सुमारास संस्थानचे तत्कालीन राजे युद्धात मृत्युमुखी पडले. त्यांच्या सात पत्नीपैकी सहा त्यांच्यासोबत सती गेल्या. त्यानंतर सातवी पत्नी गरोदर असल्याने त्या ओटवणेत विनायक वर्दे या ब्राह्मणाकडे राहायला आल्या. त्यांना मुलगा झाल्यानंतर त्याचे खेमा ठेवण्यात आले. काही वर्षानंतर हा खेमा या ब्राह्मणाची गुरे चरायला घेऊन जात असे.
एकदा दुपारची वेळ असल्याने खेमाला कुंभयाच्या झाडाखाली झोप लागली. या दरम्यान, पाच फणाच्या नागाने खेमाच्या डोक्यावर फणा धरला. नेमक्या त्याचवेळी आलेल्या ब्राह्मणाने हे भाग्याचे लक्षण पाहिले. या चमत्कारानंतर ब्राह्मणाने खेमाला जागे करून ‘तुला पुढे मोठा लाभ झाला तर मला काय देशील?’ असे विचारले. या घटनेची खेमाला काहीच माहिती नव्हती. पण खेमाने ‘जेथे माझी पत्रावळ, तेथे तुझा द्रोण’ असे सांगितले.
त्यानंतर हाच खेमा म्हणजेच सावंतवाडी संस्थानचे पहिले खेमसावंत या संस्थानच्या अधिपती विराजमान झाले. तर आपल्या पूर्वीच्या धन्यास म्हणजे या ब्राह्मणाला संस्थानच्या प्रधानपदी नेमले गेले. त्यानंतर 1627 मध्ये ओटवणे शेरवाडेवाडीत पाचफणाच्या नागमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या नागाच्या साक्षात्कारामुळे संस्थानला गतवैभव प्राप्त झाले. त्यामुळेच राजघराण्यात नागाला मानाचे स्थान असून राजघराण्याच्या सिंहासनावर नागदेवता कोरलेली पाहायला मिळते. ही पाच फणाची नागमूर्ती आणि सावंतवाडी संस्थानची न्यायदेवता असलेली ओटवणेतील रवळनाथाची मूर्ती स्वयंभू आहे. कासवावर पाच फणांचा नाग असून शिवलिंगावर रवळनाथ आहे. त्यामुळे या नाग मंदिरासह रवळनाथ मंदिर सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाची साक्ष आहे.
नागमंदिरात वार्षिक उत्सवासह चातुर्मासात दर सोमवारी भजन केले जाते. तसेच रवळनाथ मंदिरातील हरिनाम सप्ताहात सवाद्य पालखी या नाग मंदिरात येते. दहा वर्षांपूर्वी या नागमंदिराचा जीर्णोद्धार शेरवाळेवाडीतील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन केला. नागासंबंधी विविध धार्मिक विधी करण्यासाठी राज्यासह गोवा, कर्नाटकमधील भाविक ओटवणेत येतात. या नाग मंदिराच्या ऐतिहासिक महतीवर हरिहर मयेकर, कवी कृष्णा देवळी यांनी पुस्तिका तसेच सीडी प्रकाशित केली आहे.
हत्येला प्रतिबंध
नाग व कासव या दोन्ही प्राण्यांची हत्या गावात केली जात नाही. या प्राण्यांचे दर्शन झाल्यास नतमस्तक होऊन नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. तसेच या प्राण्यांना कोणी त्रास दिल्यास त्यांना परावृत्त केले जाते. गावात नाग व कासवाला देव मानण्यात आल्याने त्यांच्या संरक्षणाची शेकडो वर्षाची परंपरा आहे. गावात नागासह कासवाची मोठी संख्या असून या प्राण्यांच्या संवर्धनासाठी रवळनाथ मंदिर परिसरातील देवराई संरक्षित करण्यात आली आहे.
नागाची प्रतिकृती देऊन क्षमायाचना
गावात नागाला अनवधानाने दुखापत झाल्यास रवळनाथचरणी नागाची प्रतिकृती देऊन क्षमायाचना केली जाते. नागाचा मृत्यू झाल्याचे दृष्टीस पडताच त्याच्यावर
ब्राह्मणाच्या उपस्थितीत विधीवत अंत्यसंस्कार केले जातात. गावातील नाग व कासव संवर्धनाला धार्मिकतेची जोड असून ओटवणेवासीयांची ही पूर्वापार परंपरा
प्राणी संवर्धनाच्या दृष्टीने जगासाठी आदर्श व प्रोत्साहन देणारी आहे.









