सातारा / प्रतिनिधी:
सातारा तालुक्यातील कण्हेर गावातील सुनील वाघमळे यांच्या घराशेजारील बोअरवेलमध्ये बुधवारी सकाळी साप पडल्याचे त्यांनी पाहिले. 30 फुट अंतरावर पाणी असल्याने त्या सापाला बाहेर पडता येणार नव्हते. त्यामुळे त्यांनी व्हॉट्सऍपवर एक मेसेज व्हायरल केला. तो मेसेज साताऱयाचे सर्पमित्र सुमित्र वाघ यांच्यापर्यंत पोहचला. सुमित्र वाघ यांनी बुधवारी सायंकाळी कण्हेर येथे त्यांच्या घरी जावून बोअरवेलची परिस्थिती पाहिली. बॅटरीचा प्रकाशझोतही पोहचत नव्हता. 30 फुट लांबीपेक्षा जास्त आकाराची दोरी घेवून त्यास गाठी मारल्या अन् ती दोरी आतमध्ये सोडली. साप त्यास वेटोळे मारुन बसला अन् दोरी हळूहळू वर काढली. सापाला बाहेर काढल्यानंतर तो नाग या जातीचा असल्याचे सर्पमित्र सुमित वाघ याच्या निदर्शनास आले. त्या नागास मोकळय़ा शेतात सोडून देण्यात आले.









