ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रामध्ये सहकाराचे मूळ चांगलेच रुजले आहे. महाराष्ट्राची जडणघडण व प्रगतीमध्ये सहकारी संस्थांचे खूप मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील अनेक अडचणींच्या प्रसंगी सहकारी बँकांनी आपापल्या परीने मदतीचा हात पुढे केला आहे. सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याने तो प्रादुर्भाव रोखण्याकरिता पुण्यातील नागरी सहकारी बँकांनी पुढे येत मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता 1 कोटी 57 लाख 32 हजार 222 रुपये इतकी रक्कम मदत म्हणून दिली आहे.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन या सहकारी बँकांच्या शिखर संस्थेच्या पुढाकाराने सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे अनिल कवडे यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष ॲड. साहेबराव टकले, संचालक सुनील रुकारी, निलेश ढमढेरे, जनार्दन रणदिवे, विजयराव ढेरे, दिलीप शिंदे, चंद्रकांत कवडे आदी उपस्थित होते.








