प्रतिनिधी/ पणजी
कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच टाळेबंदी व संचारबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा बाजारपेठेत उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे.
या संबंधात सर्व सहकारी संस्था, घाऊक मालविक्रेते, किरकोळ विक्रेते, साठेदार यांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा आपापल्या आस्थापनातून करणे व त्याबरोबरच राज्यभरातून या वस्तूंच्या वितरणासाठी वाहतूक व वितरण व्यवस्था पूर्ववत सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी या सर्व आस्थापनात काम करणाऱया कर्मचाऱयांनी आपल्या कामाच्या ठिकाणी रूजू व्हावे. जेणेकरून सर्व नागरिकांना माल व्यवस्थितपणे उपलब्ध होऊ शकेल.
सर्व सहकारी संस्था, घाऊक मालविक्रेते, साठेदार व किरकोळ विक्रेते यांनी बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंडितपणे व शिस्तीत सुरू राहिल याची काळजी घ्यावी असे सदर कामात कामगारांच्या सुरक्षितेसंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात ज्यामुळे कामगारांचा आत्मविश्वास व सुरक्षिततेची भावना वृद्धिंगत होईल. यासोबतच ‘सामाजिक अंतर’ ठेवण्याचीही दक्षता घ्यावी.









