प्रतिनिधी/ बेळगाव
खडेबाजार सीलडाऊन करण्यात आले असले तरी प्रशासनाने याबाबत जनतेला विश्वासात घेतले नाही. शिवाय नेमका कोणता भाग सीलडाऊन आहे व कोणत्या भागात व्यवहार चालू राहतील, याबद्दल कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही. परिणामी सोमवारी सकाळी नागरिकांनी बॅरिकेड्सला बांधलेल्या दोऱया सोडून टाकल्या आणि बिनधास्त व्यवहार सुरू केले. दरम्यान काहीकाळ व्यापाऱयांनी आपले व्यवहार बंद ठेवले. याबाबत पोलीस स्थानकामध्ये जाऊन चौकशी करता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. शेवटी व्यापाऱयांनी नेहमीप्रमाणे आपापले व्यवहार सुरू ठेवणे पसंत केले. मात्र एकूणच या सावळय़ा गोंधळाची परिसरात चर्चा सुरू होती.
जसजशी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे, तसतसे प्रशासनातील भोंगळ कारभाराचे नमुने पुढे येत आहेत. रूग्ण आढळला की बॅरिकेड्स घालण्याचे काम प्रशासन तत्परतेने करत आहे. परंतु त्यामुळे या भागातील दैनंदिन व्यवहार सुरू राहणार की नाही, तेथील राहणाऱयांची मानसिकता, तेथील लोकांच्या अडचणी याबद्दल प्रशासन कोणतीच कल्पना देत नाही. बॅरिकेड्स तेथे कायमस्वरूपी राहतील याचीही दखल घेत नाहीत. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील त्रुटी समोर येत असून जनतेत नाराजी पसरली आहे.
शनिवारी खडेबाजारमध्ये पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने काही भाग सीलडाऊन करण्यात आला. रविवारी येथे पुन्हा पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. सोमवारी सकाळी त्याबाबत कुजबुज सुरू झाली. परंतु सकाळीच काही नागरिकांनी बॅरिकेड्सचा अडथळा नको म्हणून त्याला बांधलेल्या दोऱया कापून टाकल्या आणि व्यवहार सुरू केले. दहा वाजण्याच्या सुमारास व्यापारी व दुकानदारांसमोर व्यवहार सुरू ठेवावेत की नाहीत, याबद्दल चर्चा सुरू झाली.
काही व्यापाऱयांनी खडेबाजार पोलीस स्थानकात जाऊन त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे काही आदेश आले आहेत का, याची विचारणा केली. तेव्हा तुम्हाला पोलीस आयुक्तांकडूनच माहिती मिळू शकेल, असे सांगण्यात आले. एकूणच हा सावळा गोंधळ बघता आयुक्तांकडे जाण्याचे व्यापाऱयांनी टाळले आणि आपापले व्यवहार सुरू केले. प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट आदेश नाहीत. लॉकडाऊनमध्ये सर्व आर्थिक व्यवहार कोलमडले आणि सीलडाऊनबद्दल प्रशासन नागरिकांना संभ्रमात घालत आहे. आमचे आर्थिक नुकसान तरी किती करून घेणार, असा प्रश्न व्यापाऱयांनी उपस्थित केला व आपले व्यवहार सुरू ठेवले.









